सोमवारी (१ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंका या दोन संघांतील सामना पार पडला. या सामन्यात इंग्लडने श्रीलंकेवर २६ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटलरने या सामन्यात संघाला एक चांगली सुरुवात दिली होती. बटलरने या सामन्यात त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले आहे. त्याने ६७ चेंडूंचा सामना केला आणि १०१ धावा केल्या. यामध्ये त्याच्या सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
बटलरने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आणि आणि दुष्मंत चमीराच्या गोलंदाजीवेळी षटकार मारला आणि त्याचे शतकही पूर्ण केलं. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि चार विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९ व्या षटकामध्ये १३७ धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लडने सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडचा हा टी२० विश्वचषकातील हा सलग चौथा विजय असून तो उपांत्य सामन्यात दाखल होणारा पहिलाच संघ ठरला आहे.
याचसोबत बटरलने या सामन्यात केलेल्या खेळीच्या जोरावर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या २००० धावाही पूर्ण केल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणार तो इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे, यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने ही कामगिरी केली होती. तसेच बटलर टी२० विश्वचषकात शतक करणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ऍलेक्स हेल्सने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ११६ धावांची नाबाद खेळी केली होती.
बटलरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७८ डावांमध्ये १४१ च्या स्ट्राइक रेटने २०८५ धावा केल्या आहेत. या धावा त्याने एक शतक आणि १५ अर्धशतकांच्या जोरावर केल्या आहेत. याआधी बटलरने ऑस्ट्रेलियविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती.
आतापर्यंत टी-२० विश्वचषकात केल्या गेलेल्या शतकांचा विचार केला, तर आतापर्यंत ८ खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. आतापर्यंत ९ वेळा टी२० विश्वचषकात शतकी खेळी केली गेली आहे. यामध्ये वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने ही कामगिरी दोन वेळा केली आहे. टी२० विश्वचषकात सर्वाधिक १२३ धावांची नाबाद खेळी करण्याचा विक्रम ब्रँडम मॅक्युलम यांच्या नावावर आहे. त्याने २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता. भारतीय संघातील एकमेव खेळाडू सुरेश रैनाने टी-२० विश्वचषकात शतक करण्याची कामगिरी केलेली आहे.
https://www.instagram.com/p/CVvqbOblhda/
टी२० विश्वचषक २०२१ च्या गुणतालिकेचा विचार केला, तर गट एकमध्ये इंग्लडने त्यांचे चार पैकी चार सामने जिंकले आहेत आणि संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने त्यांच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. श्रीलंका सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वकषक: श्रीलंकेवर २६ धावांनी विजयासह इंग्लंडने सेमीफायनलचे तिकीट केले पक्के
Video: …आणि इथेच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले, सीमारेषेजवळील तो अद्भुत कॅच
मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार






