इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलर याने इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये नाही. तो टी२० विश्वचषक २०२६ मध्येही धावांसाठी संघर्ष करताना दिसला. तरी त्याला सध्याच्या फॉर्मबाबत चिंता नाही, असे म्हटले आहे.
आयपीएलमध्ये खेळताना वेगवेगळ्या संघांतील उत्तम खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळताना मदत होते. या लीगदरम्यान होणाऱ्या संवादामुळे त्याच्या खेळात सुधारणा झाली, असे म्हणाताना त्याने दिग्गज खेळाडू केविन पीटरसनचे उदाहरण दिले, त्याने राहुल द्रविडकडून आयपीएलच्या काळात शिकून आपल्या खेळात सुधारणा केली होती. बटलरने माध्यमांशी बोलताना सांगितले की त्याला मॅथ्यू हेडन सारख्या मोठ्या खेळाडूंशी चर्चा करण्याची संधी मिळाली, जी सहसा उपलब्ध नसते.
बटलरने आयपीएलमध्ये १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्याने १२१ सामन्यांमध्ये सात शतके आणि २४ अर्धशतकांसह ४१२० धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ हंगाम त्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना उत्तम कामगिरी केली होती. त्याने १४ सामन्यांमध्ये १६३ च्या स्ट्राईक रेटने ५३८ धावा केल्या होत्या. त्याने कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यासोबत चांगली कामगिरी करत गुजरातच्या वरच्या फळीला बळकट केले होते.
बटलरची आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याने ८ डावांमध्ये केवळ ८७ धावा केल्या होत्या. याचा त्याच्या यंदाच्या आयपीएल हंगामावर परिणाम होणार नाही, असे मत व्यक्त करताना त्याने म्हटले, “तो प्रत्येक हंगामाला जोमाने सुरूवात करतो. क्रिकेटमध्ये फॉर्म नेहमी बदलत असतो, मात्र खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या खचून न जाता कठोर मेहनत करत राहणे महत्वाचे असते. विश्वचषकानंतर विश्रांती मिळाल्याने ताजेतवाने वाटत आहे.”
“खराब कामगिरीमागे कोणतेही कारण नसते. खेळाडूंनी स्वत: चे विश्लेषण करत त्यामध्ये सुधारणा करणे महत्वाचे असते”, असेही बटलरने म्हटले आहे. त्याला गुजरातने २०२५ च्या हंगामासाठी १५.७५ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या विदेशी खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर आहे. टी२० विश्वचषकातील खराब फॉर्मनंतर तो आयपीएलमध्ये कशी सुरूवात करतो, याकडे लक्ष असणार आहे.






