इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला १०० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला होता, पण दुसऱ्या सामन्यात रीस टोपलीच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज अपयशी ठरले. परिणामी संघाला पराभव स्वीकारावा लागला आणि एकदिवसीय मालिका १-१ अशा बरोबरीवर आली. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉपलीचे पुनरागमन खास असल्याचे सांगितले.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टोपलीने २४ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या. इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील हे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. तब्बल १७ वर्षांपूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार पॉल कोलिंगवुड यांनी बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात ३१ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. रीस टोपली (Reece Topley) याने आता हा विक्रम मोडीत काढला. त्याचबरोबर लॉर्ड्सवर वनडेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात टोपलीने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाचे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने कौतुक केले आहे. बटलरने हेदेखील मान्य केले की, भारताविरुद्धच्या या सामन्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले, पण टॉपलीच्या प्रदर्शनाला त्याने दाद दिली. बटलर म्हणाला की, “त्याचा आतापर्यंतचा प्रवास रोमांचक ठरला आहे. पुनरागमन करून लॉर्ड्सवर ६ विकेट्स घेणे, हे अप्रतिम आहे. त्याचा अनुभव खूपच कठीण होता आणि त्याला हेदेखील माहिती नव्हते की, तो पुन्हा खेळू शकेल की नाही. त्यानंतर अशा प्रकारचे प्रदर्शन कौतुकास पात्र आहे.”
🥇 Best figures by an England Men’s bowler in an ODI
🥇 Best Men's bowling figures in an ODI at Lord’sSensational.
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/dZ5P8ObDGx
— England Cricket (@englandcricket) July 15, 2022
सामन्यात सहा विकेट्स घेतल्यानंतर टॉपली म्हणाला की, “संघाने अप्रतिम प्रदर्शन केले. हे खूप महत्वाचे होते. प्रत्येकाचे स्वप्न असते की, इंग्लंडसाठी खेळावे. तसेच भारताविरुद्ध रविवारी (१७ जुलै) खेळला जाणारा शेवटचा सामना महत्वाचा आहे.” दरम्यान, टॉपलीने ७ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण आतापर्यंत त्याला फक्त १७ एकदिवसीय आणि १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मधल्या काळात झालेल्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्द चांगलीच प्रभावित झाली होती.