इंग्लंडच्या टी२० संघाचा विद्यमान कर्णधार जोस बटलर सध्या जबरदस्त लयीत आहे. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कुटत ऑरेंज कॅपचा मानकरी बनल्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध वनडे मालिकेत त्याने विस्फोटक फलंदाजी केली होती. मात्र भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात त्याची बॅट तळपू शकली नाही आणि त्यासाठी कारणीभूत ठरला भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वरने धारधार चेंडू टाकत बटलरला शून्यावर बाद केले. यानंतर बटलरने भुवनेश्वरच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे.
भुवनेश्वरने बटलरला (Jos Buttler) इनस्विंग (In Swing) चेंडू फेकला. या चेंडूवर बटलरचा गोंधळ उडाला आणि चेंडू त्याच्या पॅडवर लागून मागे यष्ट्यांवर धडकला. अशाप्रकारे पुन्हा एकदा बटलर भुवनेश्वरचा गिऱ्हाईक ठरला. तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाला. भुवनेश्वरने बटलरला टी२० क्रिकेटमध्ये बाद करण्याची ही चौथी वेळ होती.
यानंतर भुवनेश्वरची प्रशंसा (Jos Buttler Praised Bhuvneshwar Kumar) करत बटलर म्हणाला की, “भुवनेश्वरसह इतर भारतीय गोलंदाजांनी नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी केली आणि आमच्यावर दबाव निर्माण केला. त्यानंतर आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकलो नाहीत. भुवनेश्वर बहुतेक ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत चेंडूला स्विंग करण्याची ताकद राखतो. त्याने उत्कृष्ट नियंत्रणासह गोलंदाजी केली आणि चेंडूला दोन्ही बाजूंनी स्पिन केले.”
पुढे बोलताना बटलर म्हणाला की, “टी२० क्रिकेटमध्ये मला आठवत असेल त्यापेक्षा जास्त वेळा चेंडू इथे स्विंग झाला. चेंडूला स्विंग होण्यापासून थांबवण्यासाठी आम्हाला कदाचित एखादा शॉट स्टँडवर मारण्याची गरज होती. परंतु तसे झाले नाही आणि सर्व श्रेय भारतीय संघाला जाते.”
दरम्यान टी२० क्रिकेटमध्ये बटलर विरुद्ध भुवनेश्वर या लढतीत अधिकतर वेळी भुवनेश्वरचा विजय झाल्याचे दिसते. भुवनेश्वरने आतापर्यंत बटलरला टी२० क्रिकेटमध्ये ३० चेंडू फेकताना ४ वेळा बाद केले आहे. तर बटलर यादरम्यान फक्त २८ धावा काढू शकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आख्ख्या वनडे कारकीर्दीत एकही षटकार मारू न शकलेले ‘हे’ आहेत कमनशिबी क्रिकेटर
दुर्देवाची परिसीमा! एका मॅचच्या पुढे गेले नाही ‘या’ भारतीय क्रिकेटर्सचे इंटरनॅशनल करिअर
बॅट अन् बॉल दोन्हीने चमकला, हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू प्रदर्शनासह विश्वविक्रम केला




