आज आयपीएलच्या २८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे संघ आमनेसामने होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकांत तब्बल २२० धावा केल्या.
यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरचा मोलाचा वाटा होता. त्याने तुफानी खेळी करत शतक झळकवले. त्याने या सामन्यात केलेली १२४ धावांची खेळी आयपीएल इतिहासातील राजस्थानच्या खेळाडूने साकारलेली सर्वात मोठी खेळी ठरली.
बटलरची चौफेर फटकेबाजी
या सामन्यात हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने चौफेर फटकेबाजी करत हैद्राबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली. यात ११ चौकार आणि ८ षटकारांची त्याने बरसात केली.
या शतकासह आयपीएल इतिहासात राजस्थानकडून सर्वात मोठी खेळी करणार्या फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी हा विक्रम राजस्थानचा विद्यमान कर्णधार संजू सॅमसनच्या नावे होता. त्याने याच हंगामात पंजाब विरूद्ध ११९ धावांची खेळी केली होती. याशिवाय या यादीत बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन या खेळाडूंचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सतर्फे आयपीएल इतिहासातील सर्वोच्च खेळी –
१) १२४ – जोस बटलर – विरूद्ध सनरायझर्स हैद्राबाद, २०२१*
२) ११९ – संजू सॅमसन – विरूद्ध पंजाब किंग्ज, २०२१
३) १०७ – बेन स्टोक्स – विरूद्ध मुंबई इंडियन्स, २०२०
४) १०५ – अजिंक्य रहाणे – विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१९
५) १०४ – शेन वॉटसन – विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०१५
राजस्थानचा पहिल्या डावात धावांचा डोंगर
राजस्थान रॉयल्सने दिल्लीच्या फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलत हैद्राबादविरूद्ध पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. प्रथम फलंदाजी करतांना त्यांनी सलामीवीर यशस्वी जयस्वालला लवकर गमावले होते. मात्र त्यानंतर बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनने १५० धावांची भागीदारी रचत राजस्थानला भक्कम स्थितीत पोहोचवले. बटलरने १२४ धावांची तर सॅमसनने ४८ धावांची खेळी केली. याच जोरावर त्यांनी हैद्राबाद समोर विजयासाठी २२१ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटला हटवून या धुरंधराला सलामीला पाठवा, माजी विस्फोटक फलंदाजाचा आरसीबीला मोलाचा सल्ला
बिग ब्रेकिंग! केएल राहुल ‘या’ गंभीर आजारामुळे बेजार; आयपीएल २०२१ मधून होऊ शकतो बाहेर
जोस नव्हे फुल ‘जोश’! हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बटलरचे वादळी आणि विक्रमी शतक; ठरला चौथाच खेळाडू