इंग्लंड आणि आयर्लंड यांच्या दरम्यानचा एकमेव कसोटी सामना गुरुवारी (1 जून) लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू झाला. पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने आपल्या वर्चस्व गाजवले. त्याचवेळी पहिल्या दिवशी सामना सुरू होण्याआधी इंग्लंडचा संघ मैदानावर पोहोचताना त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका आंदोलनाच्या आंदोलनकारींनी इंग्लंड संघाच्या टीम बस समोर येत निदर्शने केली.
लंडनमध्ये सुरू असलेल्या ‘जस्ट स्टॉप ऑइल’ मोहिमेच्या आंदोलकांनी इंग्लंड संघाची बस वाटेत अडवली होती. सरकारने तेल, गॅस, कोळसा कंपन्यांना दिलेले परवाने बंद करावेत, अशी या आंदोलकांची मागणी आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ स्टेडियममध्ये जात असताना हे आंदोलक टीम बससमोर आले. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एका छायाचित्रासह एक स्टोरी पोस्ट केली. ज्यामध्ये आंदोलक इंग्लंडच्या बससमोर आहेत आणि पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत.
या छायाचित्राला कॅप्शन देताना त्याने लिहिले, आम्हाला सामन्यासाठी पोहोचण्यास उशीर झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही.
पहिल्या दिवसाच्या खेळाचा विचार केल्यास यजमान इंग्लंडने एकतर्फी वर्चस्व गाजवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने सर्वाधिक पाच बळी मिळवत आयर्लंडचा डाव केवळ 172 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट खेळ दाखवला. झॅक क्राऊलीने 45 चेंडूवर 56 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन डकेट 60 व ओली पोप 26 धावांवर नाबाद असून, ते अद्याप वीस धावांनी पिछाडीवर आहेत.
(Just Stop Oil Protesters Stopping England Cricket Team Bus Bairstow Share Instagram Story)