ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. या प्रतिष्ठित मालिकेसाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी इंग्लंड लायन संघाविरुद्ध सराव सामना देखील खेळला. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याविषयी एक मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले लॅंगर?
एका मुलाखतीत बोलताना लॅंगर यांनी बर्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या स्टोक्सचे स्वागत केले. ते म्हणाले,
“तो एक शानदार खेळाडू आहे. त्यांच्यासारख्या खेळाडूविना ही मालिका एकसमान राहू शकत नाही. मला अजूनही २०१९ ऍशेसमधील त्याच्या त्या शतकी खेळीची स्वप्ने पडतात. त्याची तब्येत चांगली असेल अशी आशा आहे. तो खेळातील सुपरस्टारपैकी एक असल्याने आम्ही त्याचे येथे स्वागत करतो.”
स्टोक्सने खेळलेली ऐतिहासिक खेळी
हेडिंग्ले कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने १३५ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. इंग्लंडने एकवेळ २८६ धावांवर ९ गडी गमावले होते. येथून, ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित दिसत होता. परंतु, स्टोक्सने जॅक लीचसह शेवटच्या गड्यासाठी ७६ धावा जोडल्या. लीचने या भागीदारीत अवघ्या एका धावेचे योगदान दिलेले. याशिवाय गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही त्याने ३ बळी घेतले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय स्टोक्स
आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात पहिलाच सामना खेळताना स्टोक्स जखमी झाला होता. त्यानंतर मायदेशात भारताविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड केली गेली होती. मात्र, मानसिक तणावाचे कारण देत त्याने माघार घेतली होती. त्यानंतर, इंग्लंड संघातील अनेक खेळाडू कोरोनामूळे अनुपस्थितीत असल्याने त्याने पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत नेतृत्व केले होते. मात्र, मागील ५ महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.