कोची| राष्ट्रीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जे. उदयकुमार यांना प्रशिक्षक पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनी 100 पेक्षा जास्त सामन्यात भारताचे प्रशिक्षक पद भुषविले आहे आणि दोन विश्वचषकही मिळवुन दिले आहे.
केरळ राज्य क्रिडा संघटनेने (केएसएससी) कबड्डी प्रशिक्षक जे. उदयकुमार यांना पदावरून काढले आहे. त्यांच्याविरोधात पदाचा दुरूपयोग करणे अशा आलेल्या पुष्कळ तक्रारीमुळे त्यांना पदावरून काढण्यात आले आहे.
त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय कबड्डी संघाने 2002, 2004 आणि 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यांच्यावर पक्षपाती निवड करणे आणि महिला खेळाडूंचा लैंगिक छळ असे गंभीर आरोप आहेत. यामुळे त्यांना चौकशीला पण सामोरे जावे लागणार आहे.
” राज्य क्रिडा संघटनेने उदयकुमार यांना बडतर्फ केले आहे. हे फक्त एका तक्रारीवरून नाही तर आम्हाला त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी ह्या विविध मार्गांनी प्राप्त झाल्या आहेत”, असे केएसएससीचे सचिव संजयन कुमार यांनी सांगितले.
त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा आरोप असा की, त्यांनी 2017च्या दक्षिण विभागाच्या कबड्डी स्पर्धेत चार खेळाडूंचा बेकायदा समावेश केला होता. यामुळे जे खेळाडू यासाठी पात्र होते त्यांचे नुकसान झाले होते.
हे आरोप सिध्द झाल्याने केएसएससीने अॉक्टोबर 2017 ला केरळ कबड्डी संघटनेला स्थगित केले होते.
यावेळी उदयकुमार म्हणाले, ” मला याबद्दल काहीच कल्पना नाही आणि त्यांनी मला पदावरून काढण्याचा निर्णय घेतला. तसेच केएसएससीने मला याची अधिक माहिती पण विचारली नाही. हे खुप चुकीचे होते. यामुळे माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. तसेच माझ्यावरील आरोप चुकीचे असुन मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.”
” जर माझ्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप आहे तर ती तक्रार क्रिडा संघटनेकडे न देता पोलिसांना द्यावी. यामुळे त्या सगळ्या तक्रारी बनावटी आहेत असे सिध्द होते’,असेही ते म्हणाले.
यासंबंधी राज्य क्रिडा संघटनेने कोत्तायम येथे बैठक आयोजित केली आहे. यामध्ये पाच तालुक्यामधील सभासदांचा समावेश असणार आहे. राज्यशासनाचे निलंंबन रद्द करण्याच्या विनंतीनंतर हे प्रकरण केएसएससीने नाकारले होते.