मुंबई । कबड्डी संघांप्रमाणे कबड्डीप्रेमींमध्येही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या आगरी मंडळाच्या आगळ्यावेगळ्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेला मोठ्या दणक्यात सुरूवात झाली.
यंदाही विजेत्या संघाला माजलेला बोकड पुरस्कार रूपाने दिला जाणार असून उपविजेत्या संघाला 10 गावठी कोंबड्यावर समाधान मानावे लागणार आहे. 26 एप्रिलपर्यंत रंगणाऱया या धम्माल कबड्डी स्पर्धेची सुरूवात जय ब्राह्मणदेव आणि छत्रपती शिवाजी मंडळातील जोरदार लढतीने झाली.
आगरी कबड्डी महोत्सवाच्या निमित्ताने किरण पाटील क्रीडानगरीत पुन्हा एकदा कबड्डीचा थरार प्रभादेवीकरांना अनुभवायला मिळणार आहे.
आपल्या अनोख्या बक्षीसांमुळे कबड्डी संघांचे लक्ष वेधणाऱया या स्पर्धेत बोकडाची पार्टी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊनच 16 द्वितीय श्रेणीचे संघ एकमेकांशी झुंजणार आहेत.
मटण बिर्याणी आणि चिकन बिर्याणीची पार्टी करण्याच्या मूडच सहभागी 16 संघांमध्ये दिसत असल्यामुळे प्रभादेवीत एक अनोखी कबड्डी पाहायला मिळणार असल्याची माहिती आगरी कबड्डी महोत्सवाचे आयोजक दिनेश पाटील यांनी दिली.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आगरी मंडळाने आपल्या अनोख्या स्पर्धेत पुरस्कारांचे नावीण्य यंदाही कायम राखले आहे.
त्यांनी विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख रकमांच्या पुरस्कारासह बोकड आणि गावठी कोंबड्या जाहीर केल्या आहेत. दररोज जोरदार आणि दमदार खेळ करणारा जो खेळाडू दिवसाचा मानकरी ठरेल त्याला गावठी कोंबडीचा पुरस्कार दिला जाईल.
असाच पुरस्कार सर्वोत्तम पकड, सर्वोत्तम पकड, सर्वोत्तम चढाई आणि सर्वोत्तम खेळाडूलाही दिला जाईल, असे स्पर्धेचे क्रीडाप्रमुख कृष्णा पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेत मध्यंतराला दोन्ही संघांना उकडलेली अंडी दिली जाणार आहेत.
या स्पर्धेची केझच इतकी होती की सहभागी होण्यासाठी द्वितीय श्रेणीतील तब्बल साठ संघांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी 16 संघांना स्पर्धेत स्थान देताना आयोजकांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागली.
या स्पर्धेत प्रभादेवीतील संस्कृती, विकास, ओम श्री साईनाथ, गणेशकृपा, दादरमधील बालमित्र, अमर सुभाष, लोअर परळचे भवानीमाता, साई के दिवाने, हिंद केसरी असे द्वितीय श्रेणीतील तगडे संघ जेतेपदाच्या बोकडासाठी आपले कौशल्य पणाला लावतील.