-शारंग ढोमसे / अनिल भोईर
पहिलीच आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा त्यातही संघात देशातील दिग्गजांचा भरणा. अशा वेळी आपली कामगिरी चांगली कशी होईल यापेक्षा संघात आपण कमीतकमी राखीव खेळाडूंमध्ये कसे राहु असा विचार अनेक खेळाडू करतात. काही त्याला अपवादही असतील. परंतु अशा वेळी एक खेळाडू आहे ज्याने केवळ आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर संघातील स्थानच पक्के केले नाही तर अनेक दिग्गजांना स्पष्ट संदेश दिला ‘भावांनो, मी आलोय, जरा जपुन.’
तो खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा गिरीश इरनक. कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत या खेळाडूची एक्सप्रेस अशी काही सुसाट धावली की कुणी असा विचारही केला नसेल.
महाराष्ट्राचा एक उत्कृष्ट बाचावपटू असलेल्या गिरीशने आपण आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही कमी नाही याची चुणुक दाखवुन दिली.
अशाच या प्रतिभावान खेळाडूने या यशानंतर महा स्पोर्ट्सला खास मुलाखत दिली. या मुलाखातीचा काही खास भाग-
कबड्डी खेळायला सुरुवात कशी व कुठे झाली ?
– शाळेत असताना आमचे सुनील कोळी नावाचे क्रीडा शिक्षक होते. त्यांनी माझ्यातले गुण हेरले आणि मला शालेय स्तरावर तालुका व जिल्हा पातळीवर गोलाफेक, थाळीफेक, लांबउडी, धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सांगितले.शालेय स्तरावर कबड्डी स्पर्धा देखील होत, तेव्हा सरांनी मला सांगितलं की तू चांगला कबड्डीपटू होऊ शकतो तेव्हा पासून मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. कल्याण(प)ला ‘ओम कबड्डी’ हा एक नावाजलेला कबड्डी संघ आहे. त्या संघात प्रशांत चव्हाण, पंकज चव्हाण हे दिगग्ज खेळाडू होते. आमचे प्रशिक्षक संतोष पडवळ यांना मी भेटलो. त्यानी मला त्यांच्या संघात घेतले;तेव्हा पासून माझा कबड्डीचा प्रवास खऱ्या अर्थाने चालू झाला.
ठाणे-कल्याण सारख्या कबड्डीला पोषक वातावरणात तू वाढलास, कबड्डी खेळताना कोण होते तुझे आदर्श ?
-राकेश कुमार हे कबड्डीतील माझे आदर्श आहेत.मला कधी असे वाटले नव्हते की त्यांच्याबरोबर मला खेळायला मिळेल. प्रो कबड्डीच्या पहिल्याच पर्वात मला पाटणा पायरेट्स संघात स्थान मिळाले. राकेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं ही खुप मोठी गोष्ट होती. प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथरला विजेतेपद मिळवून देणारे प्रशांत चव्हाण यांच्यासोबत ओम कबड्डी संघात खेळायचे,तेच माझे गुरू आहेत.
प्रशिक्षक संतोष पडवळ याच्या बद्दल बोलायचं तर त्यांनी माझ्या लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं.
आवड म्हणून तू कबड्डी खेळायला सुरुवात केलीस. पण कोणत्या क्षणी तुला असे वाटले की कबड्डीकडे करियर म्हणून बघावं.
-ओम कबड्डी संघात खेळायला सुरुवात केली तेव्हा प्रशांत चव्हाण, पंकज चव्हाण यांच्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या. ओम कबड्डी संघातून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले. ते सर्व खेळाडू नावाजलेले होते. त्याचकडे बघून मला ही वाटायचं की आपली अशी ओळख असावी, सगळी कडे चर्चा व्हावी.
वयाच्या १७ व्या वर्षी एअर इंडियाच्या संघात माझी निवड झाली, तेव्हा खूप लहान होतो. जिल्हा निवडचाचणी, राज्य निवडचाचणी, मग राष्ट्रीय स्पर्धा वैगरे असतात याबद्दल काही माहीत नव्हतं. फक्त एवढचं ठरवलं होतं की चांगलं कबड्डीपटू बनायचं.
लेफ्ट कॉर्नर आणि लेफ्ट कव्हर दोन्ही जागी आज तू उत्कृष्ट खेळतोस. पण तुझ्या करियरची सुरुवात लेफ्ट कॉर्नर केली होतीस की लेफ्ट कव्हरने ?
-सुरुवात लेफ्ट कॉर्नरनेच केली होती. कबड्डीमध्ये लेफ्ट कॉर्नर हा लेफ्ट कव्हर ही लावतो, कधी कधी सामन्यात अशी वेळ यायची की त्यावेळी लेफ्ट कव्हर ही लावला लागायचं. त्यामुळे दोन्ही जागांवर खेळायला लागलो.आज दोन्ही जागांवर सहज खेळू शकतो. प्रो कबड्डीत व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ते सिध्द करुन दाखवलं आहे.
तुझ्याबद्दलची विशेष गोष्ट म्हणजे टॅकलचा टायमिंग, तुझं टायमिंग खूप अचूक आहे, त्याबद्दल काय सांगशील
-हो नक्कीच, टॅकलचा टायमिंग व कोपरा कसा लावतो या बाबतीत नवीन खेळाडू मला विचारत असतात. मी त्याना सांगतो की मॅचमध्ये रेडरची प्रत्येक रेड मी काउन्ट करत असतो. चढाईपटू कडे दोन-तीन प्रकारचे वैविध्य असते. कोणताही चढाईपटू आपल्या १० पैकी ७-८ चढाया सारख्याच करतो.त्यामुळे त्याच्या चढायांचा एकदा अभ्यास झाला की मग काम सोपे होते.
कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी भारतीय संघात तुझं नाव जाहीर झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला होता. पण सुरेंद्र नाडा सारखा अनुभवी खेळाडु असताना आमच्या गिरीशला संधी मिळेल का यांची सगळ्यांना धाकधूक होती, पण तुला संधी मिळाली आणि त्याचा तू सोनं केलंस त्याबद्दल काय सांगशील ?
-माझी पहिलीच आंतराष्ट्रीय स्पर्धा होती. सुरेंद्र नाडा सारखा दिगग्ज खेळाडू असताना मला लगेच संधी मिळेल असा वाटलं नव्हतं. भारतीय संघात निवड झाल्यामुळे खूप आनंद झाला होता. मित्र-परिवार, नातेवाईक, संघातील खेळाडू, शाळेतील शिक्षक सर्वांना खूप आनंद झाला होता.
खेळायला मिळेल अस वाटलं नव्हतं पण केनिया विरुद्ध संधी मिळाली. पहिला सामना संपूर्ण वेळ राखीव खेळाडू म्हणून बाहेर बसलो होतो. केनिया विरुद्धच्या सामन्यात चार यशस्वी पकडी केल्या, म्हणून प्रशिक्षकांनी मला पाकिस्तान विरुद्ध खेळायची संधी दिली. या सामन्यात पाच पकडी करून ,कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताकडून पहिला हाय फाय केला.
दक्षिण कोरिया विरुद्धच्या उपांत्य सामन्यात सात पकडी केल्या. स्पर्धेतील एका सामन्यातील सर्वाधिक पकडी करण्याचा हा विक्रम माझ्या नावावर झाला.
६५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अकरा वर्षांनी विजेतेपद पटकावले. त्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा होता, त्याबद्दल काय सांगशील.
-संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो क्षण अविस्मरणीय होता. गेल्याकाही वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत खेळायचा पण भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड होत नव्हती यांची महाराष्ट्राला खूप खंत होती.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड झालेली तेव्हा आम्ही ठरवलं होता की यावर्षी महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून द्यायचं. खूप मेहनतीने व जिद्दीने खेळून महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून दिलं याचा आनंद आहे.
क्रिकेट मध्ये गोलंदाजा पेक्षा फलंदाजाला अधिक लोकप्रियता मिळते, तसे कबड्डीतही चढाईपटूला अधिक लोकप्रियता मिळते पण बचवपटूंना तेवढी लोकप्रियता मिळत नाही यांची खंत वाटते का ?
-खर तर मी सुरुवातीला एक चढाईपटूच होतो मात्र कालांतराने बचाव अधिक भक्कम करू लागलो.अजय ठाकूर, राहुल चौधरी, महाराष्ट्राचा रिशांक देवडिगा या चढाईपटूंना खूप लोक पसंत करतात. त्याप्रमाणे आपल्याला ही लोकप्रियता मिळावी असे वाटायचे पण आता खुप लोक कॉल, मेसेज करून अभिनंदन करतात. खूप जण येऊन भेटतात त्यातच मी खुप खुश आहे.
कबड्डी करीयर मधील तुझा एखादा अविस्मरणीय असा क्षण की जो करियरचा टर्निग पॉईंट ठरला.
-हैद्राबाद येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळाला तो आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. आतापर्यंत खूप टर्निंग पॉईंट्स होते पण महाराष्ट्र संघातील माझ्या कामगिरी मुळे माझी भारतीय संघात निवड झाली हा महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.
इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई गेम्स साठी तुझी भारतीय संघात निवड होईल यात काही शंका नाही. यास्पर्धेसाठी कशी तयारी करशील ?
-आशियाई गेम्स साठी अजूनतरी संघाची निवड झाली नाही. थोड्याच दिवसात शिबिर लागले तेव्हा यादी समजेल. या स्पर्धेसाठी माझी निवड झाली तर कबड्डी मास्टर्स स्पर्धेपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
प्रो कबड्डी सुरू झाल्यापासून अनेक कबड्डीपटूच्या आयुष्यात बदल झाले. तुझ्या आयुष्यात काय बदल झाला?
-प्रो कबड्डीमुळे खुप बदल झाला, सुरुवातीला आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. भारतीय संघ बाहेर जाऊन आशियाई खेळ जिंकून यायचा त्याबद्दल काही चर्चा होत नव्हती. क्रिकेट व फुटबॉलला जेवढी लोकप्रियता होती, तेवढी लोकप्रियता कबड्डीला नव्हती. पण प्रो कबड्डी मुळे कबड्डीला नवीन ओळख मिळाली, प्रो कबड्डीमुळे कबड्डी टी.व्ही. वर दिसू लागली.
प्रो कबड्डीमूळे आम्हाला पण लोकप्रियता मिळाली. मॉल, एयरपोट वर जातो तेव्हा लोक गिरीश इरनकला नावाने ओळखू लागली.प्रो कबड्डीमूळे खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यामुळे आयुष्यात खूप बदल झाले.प्रो कबड्डीमुळे अनेक खेळाडूंच्या डोक्यात हवा गेली आहे, पण माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि जोपर्यंत मी कबड्डी खेळतोय तोपर्यंत माझे पाय जमिनीवरच राहतील.
पुणेरी पलटणने तुला पुढच्या हंगामासाठी कायम केलं आहे. तुझ्यावर विश्वास दाखवून तुला संघाने कायम केलं त्याबद्दल काय सांगशील ?
-पुणेरी पलटणचे मालक व व्यवस्थापक नक्की चांगले आहेत. माझा मागच्या वर्षीच कामगिरीमुळे मला कायम केलं त्याचा आनंद आहे. पाचव्या हंगामात आम्हाला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. प्रो कबड्डीत मी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचा बक्षीस मिळवला आहे, पण प्रो कबड्डीच विजेतेपद पटकवायचं स्वप्न आहे. यावर्षी खूप मेहनत करून पुणेरी पलटण विजेतेपद मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
प्रत्येक खेळाडूची काही स्वप्न असतात, तुझी स्वप्न पूर्ण झालीत का किंवा काही स्वप्न साकार करायची आहेत का ?
– माझी बहुतेक सर्वच स्वप्न पूर्ण झाली आहेत.आता एकच स्वप्न पूर्ण व्हायचं राहिलंय ते म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च मानाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळवण्याचा स्वप्न.तो पुरस्कार मिळाला तर आयुष्यात खूप काही केल्याचं समाधान मला मिळेल.
महाराष्ट्राच्या असंख्य जणांचा आवडता खेळाडू गिरीश आहे, मात्र गिरीशचे आवडते खेळाडू कोण आहेत?
-माझा आवडते खेळाडू राकेश कुमार, अजय ठाकूर व माझे गुरू प्रशांत चव्हाण हे आहेत. आज जे काही कबड्डीत मिळवलं आहे ते प्रशांत चव्हाण याच्यामुळेच मिळवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्लाॅग- गिरीश, पुढील महिन्यात तुझ्या नावापुढे “आशियाई गेम्स गोल्ड मेडलिस्ट” लागावं
भारताने पटकावले कबड्डी मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद, आंतरराष्ट्रीय कबड्डीत भारताचा दबदबा कायम