शिव ओम्,स्वराज्य, संघर्ष, मुं.पोलीस, महात्मा गांधी, शिवशक्ती, एम एच स्पोर्ट्स यांनी महिलांत, तर यजमान मुं. महानगर पालिका, युनियन बँक, महाराष्ट्र पोलीस, महिंद्रा, माझगाव डॉक यांनी पुरुषांत मुं. उपनगर कबड्डी असो. आयोजित ” मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत” विजयी सलामी दिली.
कुर्ला, नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झालेल्या महिलांच्या ब गटात पुण्याच्या शिव ओम् ने उपनगरच्या टागोर नगरला २५-१९ असे नमविले. मध्यांतराला १६-०७अशी आघाडी घेणाऱ्या पुणेकराना उत्तरार्धात थोडा प्रतिकार झाला. पुण्याकडून तृप्ती दुर्गे, स्नेहा साळुंखे, पायल वसवे तर टागोर नगरकडून नेहा सनगरे, सायली फाटक, नेहा फाटक यांचा खेळ उत्कृष्ट होता.
अ गटात उपनगरच्या स्वराज्यने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा ४२-२१असा सहज पराभव केला. स्मिता पांचाळ, अंजली रोकडे यांना या विजयाचे श्रेय जाते. कर्नाळाच्या रचना म्हात्रेला उत्तरार्धात सूर सापडला, पण संघाला विजयी करण्यास तो पुरेसा नव्हता. क गटात संघर्षने कोमल देवकर, कोमल यादव यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रत्नागिरीच्या अनिकेत स्पोर्ट्सचा ३८-२८ असा पाडाव केला.
पूर्वार्धातच दोन लोण देत विश्रांतीला २४-०८अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. अनिकेतच्या समरीन बुरोंडकर, सुप्रिया थोटे यांनी बरी लढत दिली.
याच गटात पुण्याच्या एम एच स्पोर्टसने मुं. शहरच्या अमरहिंदचे कडवे आव्हान २५-२१ असे मोडून काढले.मध्यांतराला ०७-१२ अशा ५गुणांनी पिछाडीवर पडलेल्या पुणेकरांनी उत्तरार्धात मात्र जोरदार प्रतिकार करीत विजय खेचून आणला.
त्यातच अमरहिंदची तेजस्वीनी पोटे जायबंदी झाली. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले. प्रतिक्षा कटके, आरती भिलारे, स्वप्नाली पासलकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमरहिंदकडून तेजस्वीनी पोटे, जयश्री काटकर, प्रियांका पवार यांनी कडवी लढत दिली.
पुरुषांच्या अ गटात युनियन बँकेने किंग्ज इलेव्हनचा ३२-१९ असा पाडाव करीत आगेकूच केली.मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला दोन्ही संघ १०-१०असे बरोबरीत होते. नंतर मात्र बँकेच्या नितेश मोरे, राजेश बेंदूर, संतोष वारकरी, कुशल म्हात्रे यांनी आपल्या नेत्रदीपक खेळाने हा सामना एकतर्फी केला.
उत्तरार्धात बँकेने २२गुण मिळविले,तर किंग्ज इलेव्हनला अवघे ०९गुण मिळविता आले. अक्षय परब, रोहन कदम, चेतन पानवलकर यांचा उत्तरार्धात सूर हरपला. क गटात यजमान मुंबई महानगर पालिकेने बेस्टला ४५-१७असे लोळविले. मध्यांतराला २८-०५ अशी मोठी आघाडी घेणाऱ्या पालिकेची नंतर मात्र सामन्यावरील पकड थोडी ढिली झाली.
पालिकेकडून आकाश कदम, विनायक शिंदे, तर बेस्टकडून जितेंद्र दळवी, रत्नाकर पाटील यांचा खेळ छान झाला. ड गटात महाराष्ट्र पोलीस संघाने अग्निशमन दलाचा ३८-०७असा धुव्वा उडविला. सुलतान डांगे, नामदेव इस्वलकर, बाजीराव होडगे, देवेंद्र कदम यांच्या आक्रमणा पुढे अग्निशमनचा निभाव लागला नाही. क गटात महिंद्राने बेस्टचा ३७-१३असा सहज पराभव केला.
या दुसऱ्या पराभवामुळे बेस्टचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ओमकार जाधव, आनंद पाटील यांच्या धारदार चढाया, तर स्वप्नील शिंदे, ऋतुराज कोरवी यांच्या भक्कम बचावामुळे महिंद्राने पूर्वार्धातच दोन लोण देत २३-०८अशी भक्कम आघाडी घेतली.
उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना सहज खिशात टाकला. बेस्टचा अमेय महादे बरा खेळला. ब गटात माझगाव डॉकने आर के इंजिनियरिंगचा ३२-१३असा पराभव केला. जयदीप चौधरी, अभिषेक नर, परेश ठाकूर, भरत कलगुटकर यांच्या उत्कृष्ट खेळा पुढे आर के ची मात्रा चालली नाही. आर के चा सागर कदम बरा खेळला.
इतर निकाल संक्षिप्त महिला विभाग :- १)मुं. पोलीस वि वि नवशक्ती ड गट (२२-१८); २) महात्मा गांधी वि वि विश्वशांती – पालघर अ गट (६७-११); ३) शिवशक्ती वि वि चिपळूण अकादमी ब गट (२५-१३).
या स्पर्धेचे उदघाटन विभागीय आमदार मंगेश कुडाळकर, संघटनेचे उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव रमेश हरयाण, स्पर्धा निरीक्षक मनोहर इंदुलकर पी एस आय कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.