वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा मोर्ने मॉर्केलला मागे टाकून दक्षिण आफ्रिकेसाठी पाचवा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. रबाडानं ही कामगिरी बांगलादेशविरुद्ध ढाका येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात केली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यानं 46 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. यामध्ये महमुदूल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनूल हक, मुशफिकुर रहीम, मेहंदी हसन मिराज आणि नईम हसनच्या विकेटचा समावेश आहे.
कागिसो रबाडाच्या आता 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.18 च्या सरासरीनं 536 विकेट झाल्या आहेत. तर मोर्ने मॉर्केलनं 535 विकेट घेतल्या आहेत. रबाडाची सर्वोत्कृष्ट कामगिरी 112 धावा देऊन 7 बळी आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत 20 वेळा चार विकेट, 17 वेळा पाच विकेट आणि 4 वेळा दहा विकेट घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज महान अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॅक आहे. त्यानं 414 सामन्यांमध्ये 23.63 च्या सरासरीनं 823 विकेट घेतल्या आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात रबाडा 300 कसोटी विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा केवळ सहावा गोलंदाज बनला होता. त्यानं अवघ्या 11,817 चेंडूत ही कामगिरी केली, जी कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान आहे. आता रबाडाच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 308 विकेट झाल्या आहेत.
या सामन्यात रबाडानं 72 धावा देऊन 9 विकेट घेतल्या. आशिया खंडात आठ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन होता. स्टेननं 2014 साली श्रीलंकेविरुद्ध 99 धावा देऊन 9 विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, भारतीय उपखंडात दक्षिण आफ्रिकेनं जिंकलेला हा शेवटचा कसोटी सामना होता.
हेही वाचा –
हा भारतीय खेळाडू बनतोय बळीचा बकरा? प्लेइंग एलेव्हनमधून पुन्हा एकदा विनाकारण वगळलं
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्कोरसह झिम्बाब्वेनं बनवले अनेक रेकॉर्ड!
रोहित शर्माने केएल राहुलसह या खेळाडूंना वगळले, या स्टार अष्टपैलूचा तीन वर्षांनी संघात प्रवेश





