पर्ल येथे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे मालिका (SAvIND ODI Series) बुधवारपासून (१९ जानेवारी) सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत अनुभवी भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर युवा दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ नक्कीच प्रयत्न करेल. मात्र, या मालिकेपूर्वी संघिला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) या मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
या कारणाने झाला रबाडा मालिकेतून बाहेर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने रबाडा आगामी मालिकेतून बाहेर झाल्याची पुष्टी केली. त्याच्या गैरहजेरीचे कारण वर्कलोड मॅनेजमेंट सांगण्यात आले आहे. रबाडा याला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी त्याला वनडे मालिकेत सामील करण्यात आले नाही असे बोर्डाकडून सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत २० बळी मिळवून तो मालिकेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. त्याच्यासोबत संघाचा दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए हादेखील मालिकेत सहभागी होणार नाही. तो कसोटी मालिकेच्या आधीच दुखापतग्रस्त झाला होता.
हे आहेत पर्याय
दक्षिण आफ्रिकेकडे रबाडाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. संघात सिसांडा मगला, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस आणि वेन पार्नेलसारखे वेगवान गोलंदाज आहेत. यासोबतच रबाडानंतर कसोटी मालिकेत १९ बळी घेणाऱ्या मार्को जेन्सनचाही वनडे संघात समावेश आहे.
भारतीय संघाला दिलासा
कगिसो रबाडा वनडे मालिकेत न खेळल्यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे. या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारताविरुद्ध वनडेमध्ये १२ सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत. रबाडा आपल्या भूमीवर अधिक धोकादायक आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याने ३७ सामन्यांत ५४ बळी आपल्या नावे केलेत.
पहिल्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, टेंबा बवुमा (कर्णधार), एडेन मार्करम, रसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जेन्सन, तबरेझ शम्सी, ड्वेन प्रिटोरियस आणि लुंगी एन्गिडी.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेत टीम इंडियाला छळू शकतो पदार्पणवीर वेगवान गोलंदाज (mahasports.in)