दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात ढाका येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडानं इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. रबाडानं आपल्याच देशाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज वकार युनूससारख्या दिग्गजांना मागे टाकलं.
यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर होता. त्यानं 12602 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते. आता रबाडानं 11817 चेंडूत 300 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानं 12605 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते. या यादीत चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड आहे. त्यानं 13672 चेंडूंमध्ये 300 कसोटी बळी पूर्ण केले होते.
सर्वात कमी चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण करणारे गोलंदाज
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – 11,817 चेंडू
वकार युनूस (पाकिस्तान) – 12,602 चेंडू
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) – 12,605 चेंडू
ॲलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) – 13,672 चेंडू
कागिसो रबाडा हा असा वेगवान गोलंदाज आहे, जो दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्यानं आतापर्यंत 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रबाडानं 2014 मध्ये टी20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
रबाडानं कसोटीच्या 116 डावांमध्ये गोलंदाजी करताना 22.08 ची सरासरी आणि 39.4 च्या स्ट्राइक रेटनं 299 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 13/144 आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 99 डावांमध्ये त्यानं 27.77 च्या सरासरीनं 157 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 6/16 आहे. टी20 आंतरराष्ट्रीय मधील 65 डावांमध्ये या आफ्रिकन गोलंदाजानं 27.15 च्या सरासरीनं 71 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/18 आहे.
हेही वाचा –
टीम इंडियाबाहेर असलेला हा खेळाडू ठोकतोय शतकावर शतकं! ब्रायन लाराचा विक्रमही मोडला
चॅम्पियन्स ट्रॉफीचं काय होणार? बीसीसीआयनं पाकिस्तानचा हा प्रस्ताव धुडकावला! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप विजयामागे भारताचा हात, कर्णधार सोफी डेव्हाईननं केला मोठा खुलासा