आयपीएल २०१८ ला परवा म्हणजेच ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या आयपीएलच्या ११ व्या मोसम सुरु होण्याआधीच दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधूनही बाहेर पडावे लागले आहे. तो मागीलवर्षाप्रमाणेच यावर्षीही दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणार होता. परंतु त्याला पाठीची दुखापत झाल्याने तीन महिने क्रिकेट पासून दूर राहावे लागणार आहे.
रबाडा सध्या आयसीसी गोलंदाजी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच तो नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २३ विकेट घेऊन मालिकावीर ठरला होता.
तो ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चौथ्या कसोटीच्यावेळीच पाठीच्या दुखापतीमुळे संघर्ष करत होता.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पहिला सामना ८ एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहेत.
आजवर मिळालेल्या माहितीनुसार ७ खेळाडू आयपीएल २०१८ मधून बाहेर पडले आहेत. यात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे बंदी मुळे खेळणार नाहीत, तर ख्रिस लिन, मिशेल स्टार्क, मिशेल सॅन्टेनर, नॅथन कुल्टर नाईल आणि कागिसो रबाडा हे खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या ११ व्या मोसमातून बाहेर पडले आहे.