आयपीएल २०२१ चा ४० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान राॅयल्स या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान राॅयल्सवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर जेसन राॅयने (६०) आणि कर्णधार केन विलियम्सन (५१) यांनी अर्धशतके ठोकली. सामन्यात विजय मिळाल्यानंतर रॉय आणि विलियम्सन दोघेही आनंदी दिलसे. तसेच जेसन राॅयला सामनावीर निवडले गेले.
जेसन रॉयला या सामन्यात केलेल्या खेळीमुळे सामनावीर निवडले गेले. तो म्हणाला,
“मी सनरायझर्स संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. मी खूप आनंदी आहे आणि यापेक्षा जास्त यासाठी की, आम्ही विजय मार्गावर परतलो. त्याने (रिद्धिमान साहा) या भागीदारीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. मला थोडा वेळ घेण्याची परवानगी दिली. आमच्यासाठी ही एक अवघड स्पर्धा होती. मात्र, मैदानावर येणे आणि चेहऱ्यावरील हास्यासोबत अशाप्रकारे खेळण्यासाठी आम्हाला आमचे पाय जमीनीवर ठेवावे लागतील आणि योग्य काम करावे लागेल.’
सनरायझर्सचा दुसरा विजय
दुबई येथील या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा बनविल्या होत्या. कर्णधार संजू सॅमसनने अप्रतिम ८२ धावांची खेळी केली. तसेच युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल व अष्टपैलू महिपाल लोमरोर यांनी उपयुक्त योगदान दिले. हैदराबादच्या गोलंदाजांनी अखेरच्या चार षटकात अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थानचा डाव मर्यादित ठेवला होता. प्रत्युत्तरात, जेसन रॉय व वृद्धिमान साहा यांनी हैदराबादला आक्रमक सलामी दिली. लोमरोरने साहाला बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने नाबाद अर्धशतक झळकावून संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. असे असले तरी, हैदराबादच्या प्ले ऑफमध्येमध्ये जाण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.