न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ख्राइस्टचर्च येथे रविवारपासून (३ जानेवारी) दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले असून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र पाकिस्तान संघ ८४ षटकात २९७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाबाद राहत दीडशतकी खेळीचा आकडा ओलांडला आहे. यासह त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
पाकिस्तानच्या २९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्या ३० षटकांच्या आतच टॉम लॅथम, टॉम बंडल आणि रॉस टेलर यांच्या महत्त्वपुर्ण विकेट्स गमावल्या. मात्र पुढे आक्रमक फलंदाज विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांनी २५० पेक्षा जास्त धावांची भागिदारी रचत संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
विलियम्सनने २८६ चेंडूंचा सामना करत नाबाद १७७ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २३ चौकार ठोकले आहेत. यासह विलियम्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या ८३ कसोटी सामन्यात त्याने हा मोठा विक्रम केला आहे.
विलियम्सनपुर्वी केवळ न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू स्टिफन फ्लेमिंग यांनी हा किर्तिमान केला आहे. परंतु त्यांना हा पराक्रम करण्यासाठी ९० पेक्षा जास्त कसोटी सामने लागले होते. त्यामुळे सर्वात जलद ७००० धावांचा टप्पा गाठणारा विलियम्सन पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे.
https://twitter.com/ICC/status/1346226802277146631?s=20
टेलरने आतापर्यंत १०४ कसोटी सामन्यात ४५.४८ सरासरीने ७३६८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ३ द्विशतके आणि १९ शतके ठोकली आहेत. तर फ्लेमिंग यांनी १११ कसोटी सामन्यात ४०.०७च्या सरासरीने ७१७२ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ३ द्विशतकांचा आणि ९ शतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनीत भारतीय खेळाडूंवर लागू झालेत निर्बंध; हॉटेलच्या बाहेर जाण्यासही परवानगी नाही
“युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा”, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती






