दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघामध्ये आयपीएलचा सामना खेळवला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात हैद्राबादला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करतांना हैद्राबादला २० षटकांत १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यापूर्वी हैद्राबादने नेतृत्व बदल केला होता. संघर्ष करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी त्यांनी केन विलियम्सनच्या हाती कर्णधारपदाची धुरा दिली होती. मात्र विलियम्सनला पहिल्या सामन्यात तरी अपयश आले. तसेच पराभवासह एक नकोसा विक्रमही त्याच्या नावे झाला.
कर्णधार म्हणून ओढवली नामुष्की
या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या डावात अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला. यात राजस्थानचा सलामीवीर बटलरच्या १२४ धावांचा मोलाचा वाटा होता.
बटलरच्या या शतकामुळेच विलियम्सनच्या नावे नकोसा विक्रम झाला. बटलरने झळकावलेले शतक हे विलियम्सन कर्णधार असतांना त्याच्या संघाविरुद्ध आयपीएल मध्ये मारलेले सहावे शतक ठरले. त्यामुळे कर्णधारपद सांभाळताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांनी मारलेल्या शतकांच्या यादीत विलियम्सन दुसर्या स्थानी पोहोचला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसह संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी ७ शतकांसह अव्वल स्थानी आहे.
कर्णधार असतांना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी झळकवलेली सर्वाधिक शतके –
१) एमएस धोनी – ७
२) केन विलियम्सन – ६*
३) विराट कोहली – ६
४) गौतम गंभीर – ५
५) सुरेश रैना – ४
राजस्थानचा सफाईदार विजय
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने या सामन्यात तिन्ही आघाड्यांवर सरस खेळ करत सनरायझर्स हैद्राबादला मात दिली. प्रथम फलंदाजी करतांना राजस्थानने ३ बाद २२० धावा केल्या होत्या. यात जोस बटलरच्या १२४ तर संजू सॅमसनच्या ४८ धावांचा समावेश होता. या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबादला ८ बाद १६५ धावा करता आल्या. राजस्थानकडून मुस्तफिझुर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या:
RR vs SRH : राजस्थानने उडवला हैद्राबादचा धुव्वा, ५५ धावांनी मिळवला रॉयल विजय
आपल्याच कर्णधाराचा विक्रम काढला मोडीत, शतकासह बटलरने या यादीत पटकावले अव्वल स्थान
विराटला हटवून या धुरंधराला सलामीला पाठवा, माजी विस्फोटक फलंदाजाचा आरसीबीला मोलाचा सल्ला