न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं टी20 विश्वचषक 2024 च्या साखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. दिग्गज ब्रँडन मॅक्युलमच्या निवृत्तीनंतर त्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये किवी संघाची कमान सांभाळली होती.
कर्णधार म्हणून केन विल्यमसनची कारकीर्द उत्कृष्ट राहिली. अनेक चाहत्यांना वाटतं की, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली दुर्दैवी राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अनेक जेतेपदं जिंकायला हवी होती. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या बाबतीत केन विल्यमसन विराट कोहलीपेक्षा जास्त दुर्दैवी होता. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघ प्रत्येक स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. त्यानं आयसीसीच्या सहा मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचं नेतृत्व केलं, मात्र त्यांना केवळ एकदाच यश मिळवता आलं.
2016 टी20 विश्वचषक सेमीफायनल – 2016 च्या टी20 विश्वचषकात किवी संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडवर 7 गडी राखून सहज विजय मिळवला. या पराभवासह न्यूझीलंडचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.
2019 विश्वचषक फायनल – 2019 एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड यांच्यात खेळला गेला. साखळी फेरीत चांगली कामगिरी करून अंतिम फेरी गाठणारा किवी संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र, अंतिम सामना दोनदा टाय झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे हरला.
2021 टी20 विश्वचषक फायनल – टी20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईत खेळला गेला. येथेही केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. परंतु अंतिम सामन्यात संघाला 8 गडी राखून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
2022 टी20 विश्वचषक सेमीफायनल – केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघानं 2022 टी20 विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. संघाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आलं. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना पाकिस्तानविरुद्ध 7 गडी राखून पराभव पत्कारावा लागला.
2023 विश्वचषक सेमीफायनल – केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघानं 2023 विश्वचषक स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघ पहिल्यांदाच विश्वचषकाचं विजेतेपद जिंकेल असं वाटत होतं. परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाला भारताविरुद्ध पराभव पत्कारावा लागला.
2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता – विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं 2021 मध्ये एकमेव विजेतेपद पटकवलं. पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात किवी संघानं विराट कोहलीच्या भारतीय संघाचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला
श्रेयस अय्यरचा होणार टीम इंडियात कमबॅक! रियान पराग, अभिषेक शर्मालाही मिळू शकते संधी
“हरिस, तू खंबीर राहा…आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत”; व्हायरल व्हिडिओवर शाहीन आफ्रिदीची प्रतिक्रिया