1 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण या मालिकेतून न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन दूखापतीमुळे बाहेर पडला आहे.
त्याला हिप इंजूरी(मांड्याच्या वरच्या भागाची दुखापत) झाल्याने तो या टी20 मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊथीकडे सोपवण्यात आले आहे.
विलियम्सनच्या दुखापतीबद्दल सांगताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, ‘आम्ही त्याच्या दूखापतीवर लक्ष ठेवून आहोत. त्याच्या याच दुखापतीमुळे त्याला मार्चमध्ये बांगलादेश विरुद्धचा शेवटचा कसोटी सामनाही मुकावा लागला होता.’
‘मायदेशातील क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीसच विलियम्सनसाठी ही निराशाजनक वेळ आहे. पण पुढील व्यस्त मोसमामुळे त्याला विश्रांती देणे हा योग्य निर्णय आहे.’
साऊथीने याआधी सप्टेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंडचे टी20मध्ये नेतृत्व केले होते. त्याच्याबद्दल स्टेड म्हणाले, ‘आम्ही नशीबवान आहोत की साऊथीसारखा अनुभवी खेळाडू संघात आहे, जो पुढे येऊन नेतृत्वाची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याने नुकत्याच आम्ही केलेल्या श्रीलंका दौऱ्यात ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.’
त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघात पहिल्या तीन टी20 सामन्यांसाठी लॉकी फर्ग्यूसनचाही समावेश करण्यात आला आहे. तो अंगठ्याच्या दुखापतीनंतर या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
तसेच शेवटच्या दोन टी20 सामन्यांसाठी फर्ग्यूसनऐवजी ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आला आहे. तो शेवटचे दोन टी20 सामने खेळण्याआधी देशांतर्गत क्रिकेटमधील प्लंकेट शिल्ड स्पर्धेत नॉर्दन नाईट्सकडून 1 चार दिवसीय सामना खेळेल.
असा आहे इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ –
टिम साऊथी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट (शेवटच्या दोन सामन्यांसाठी), कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन (पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गप्टिल, स्कॉट कुगलेजिन, डॅरील मिशेल, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट , ईश सोधी, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर.