न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी हॅमिल्टनच्या मैदानावर खेळली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं शानदार फलंदाजी केली. परंतु त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. विल्यमसननं 87 चेंडूंत 9 चौकारांसह 44 धावांची खेळी खेळली. त्याला मॅथ्यू पॉट्सनं बोल्ड केलं. मात्र, विल्यमसन ज्या विचित्र पद्धतीनं बोल्ड झाला, ते पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. विल्यमसननं अक्षरश: स्वत:च्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतली. त्याचा अशाप्रकारे बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक, विल्यमसननं 59व्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हातानं खेळला. परंतु चेंडू चुकला आणि स्टंपजवळ गेला. यानंतर विल्यमसन पटकन वळला आणि त्यानं पायानं चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र असं करताना चुकीनं त्याचा पाय स्टंपवर आदळला. अशाप्रकारे विल्यमसननं स्वत:च स्वत:ला बाद केलं.
विल्यमसनला मैदानावरच त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला. तो काही वेळ स्टंपजवळ उभा राहिला आणि त्यानं खेदानं मान हलवली. विल्यमसन बाद झाल्यानंतर मैदानावर सहसा इतकी निराशा व्यक्त करत नाही. मात्र यावेळी तो खूपच निराश दिसत होता. त्याच्या अशाप्रकारे बाद होण्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तुम्ही त्याच्या बाद होण्याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
When it comes to the word “Unlucky” ; my mind always think of KANE WILLIAMSON .
— JJ (@JillaJayaram5) December 14, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, न्यूझीलंडनं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 82 षटकांत 9 गडी गमावून 315 धावा केल्या. कर्णधार टॉम लॅथमनं 135 चेंडूत 63 धावा केल्या. त्यानं विल यंगसोबत पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. यंगनं 42 धावा केल्या. कर्णधारानं विल्यमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. टॉम ब्लंडेल (21), रचिन रवींद्र (18) आणि डॅरिल मिशेल (14) यांना मोठा डाव खेळता आला नाही.
आपली शेवटची कसोटी खेळत असलेल्या टीम साऊदीनं 23 धावांचं योगदान दिलं. मिचेल सँटनर 54 चेंडूत 50 धावा केल्यानंतर नाबाद आहे. इंग्लंडसाठी पॉट्स आणि गस ऍटकिन्सननं प्रत्येकी 3 तर ब्रेडन कार्सनं 2 गडी बाद केले. न्यूझीलंडकडे या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी आहे.
हेही वाचा –
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार
गाबा कसोटी ड्रॉ राहिली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार! कसं ते जाणून घ्या
शोएब अख्तर बरळला, जसप्रीत बुमराहला दिला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला