-श्वेता चिदमलवाड
८३… हा अंक ऐकताच क्रिकेटप्रेमींना आठवते- ते वर्ष, तो दिवस, ज्याची भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यात आली आहे. हो “२५ जून १९८३” हाच तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी पहिल्यांदा तो वनडे विश्वचषक भारतीय खेळाडूंच्या हातात दिसत होता. या दिवसाने भारतीय क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली होती. यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या कपिल देव यांची सर्वत्र वाह-वाह होत होती.
चंदीगडचा हा सिंह तेव्हापासून भारतीय संघाचा ‘हिरो’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या हिरोची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये हातखंडा असणाऱ्या कपिल देव यांच्या कारकिर्दीची सुरुवात जरी विशेष झाली नसली. तरी त्यांच्या कारकिर्दीचा शेवट मात्र अविस्मरणीय ठरला. एका विश्वविक्रमासह, जो पुढे ६ वर्षे त्यांच्याच नावावर राहिला.
चला तर जाणून घेऊया, त्या अविस्मरणीय विश्वविक्रमाची कहाणी. सोबतच त्या हिरोच्या तोंडून निघालेले ते विधान, ज्याने सगळ्या मीडियाची बोलती बंद केली होती.
कपिल देव यांचा विश्वविक्रम
मार्च १९९४. कपिल देव यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना. हा सामना झाला होता न्यूझीलंडविरुद्ध. पण, कपिल यांच्या विश्वविक्रमाच्या कहाणीचा स्टार्ट-अप फेब्रुवारीमध्येच झाला होता. फेब्रुवारी १९९४ला श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना ८ फेब्रुवारी १९९४ला अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळण्यात आला होता.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ३४ धावांवर रोशन महानामाची पहिली विकेट पडली. खेळपट्टीवर हसन तिलकरत्ने फलंदाजी करत होता. कुंबळेचे षटक संपले आणि आता गोलंदाजीला आले होते कपिल देव. त्यांनी चेंडू टाकला आणि तिलकरत्नेने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू मैदानाबाहेर नाही तर हातात होता, शॉर्ट लेगवर उभा असणाऱ्या संजय मांजरेकरच्या. पूर्ण स्टेडियममध्ये जोरदार आवाज घुमत होता. एक मिनिटापर्यंत सगळेजण आपापल्या सीटवरुन उभे राहुन टाळ्या वाजवत होते.
गोंधळात पडलात ना. एका विकेटसाठी इतकी प्रशंसा! खरं तर ही एक विकेट कपिल यांची ४३२वी विकेट होती. या एका विकेटने न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडलीच्या नावावर असणारा कसोटीतील सर्वाधिक ४३१ विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला होता. कपिल हे कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे जगातील अव्वल क्रमांकाचे गोलंदाज ठरले होते. सर्वांना त्या एका विकेटची अपेक्षा होती. अहमदाबादच्या क्रिकेट चाहत्यांनी तर पूर्व तयारीही करुन ठेवली होती. इकडे कपिल यांनी त्यांची ४३२ विकेट घेतली आणि तिकडे अहमदाबादच्या चाहत्यांनी ४३२ फुगे आकाशात उडवले.
कपिल देव यांचे ते विधान
गुजरातमधील अहमदाबादशी कपिल यांचे वेगळेच नाते होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अहमदाबादच्या स्टेडियमवर नोंदवण्यापुर्वीही कपिल यांनी अहमदाबादमध्ये अजून एक पराक्रम केला होता. नोव्हेंबर १९८३मध्ये, अहमदाबादच्या त्याच सरदार पटेल स्टेडियमवर कपिल यांनी कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली होती. यावेळी वेस्ट इंडिविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात कपिल यांनी ८३ धावा देत ९ विकेट्स घेतल्या होत्या. उर्वरित एक विकेट बलविंदर सिग संधूच्या खात्यात जमा झाली होती.
दुसऱ्या डावातील पहिलीच डेसमंड हेंन्सची विकेट संधूने घेतली होती. त्यानंतर संघातील ९ फलंदाजांना कपिल यांनीच पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. असा दमदार पराक्रम केल्यामुळे जगभरातील पत्रकार कपिल यांची मुलाखत घेण्यासाठी आतुरलेले होते. यावेळी घडलेला एक रोमांचक किस्सा कपिल यांचे संघसहकारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितला होता.
सिद्धू म्हणाले होते की, “आमच्या विश्रांती करण्याच्या दिवशी २५० पेक्षा जास्त पत्रकार कपिल पाजींची मुलाखत घेण्यासाठी तयार होते. पण, त्यातील जास्त तर पत्रकार हे इंग्रजी प्रश्न विचारणारे होते. मी पाजीला म्हणालो, पाजी बाउंसर पडणार तेथे इंग्रजीचे. मिनाक्षी शेषाद्रीचा हीरो रिलीज होतोय. चला तिकडे जाऊ. बेटर ऑप्शन आहे. पण, पाजी म्हणाले, काळजी नको करु सरदार. मग काय.”
“आम्ही दोघेही मुलाखतीसाठी पोहोचलो. प्रश्नांचा पाऊस पडत होता. पण एकच प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला. ‘मिस्टर कपिल देव, व्हाय कान्ट अ कंट्री ऑफ वन बिलियन पीपल प्रोड्यूस अनादर कपिल देव?’ अर्थात, ‘१ अब्ज लोकसंख्या असणाऱ्या देशात कपिल देवसारखा फक्त एकच गोलंदाज का’?”
“पाजी म्हणाले, माझी आई आता ६२ वर्षांची आहे. माझे वडील या जगात नाहीत. म्हणून दुसरा कपिल देव निर्माण झाला नाही.” आणि मग काय, सर्वजण हक्केबक्के. तिथेच ती मुलाखत संपली. असं म्हणतात की, वेगवान गोलंदाज जोडीमध्ये शिकार करतात. पण, कपिल यांना त्यांचा जोडीदार मिळाला नाही. नाही तर कदाचित कपिल यांची कसोटीतील विकेट्सची संख्या अजून जास्त असली असती.
कपिल देव यांचा शेवटचा कसोटी सामना (१९ मार्च १९९४)
वेगवान गोलंदाजीचा बादशहा आता थोडा थकला होता. त्याचा वेग मंदावला होता. संघात अनेक नवे गोलंदाज उपस्थित होते आणि ते आता कपिल यांच्यापेक्षा उत्तम करु शकत होते. ही बाब लक्षात येताच, कपिल यांनी घोषणा केली की, मी न्यूझीलंड दौऱ्यावर हॅमिल्टन येथे होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेईन.
या सामन्यातील २ डावात २ विकेट्स घेत, कपिल यांनी १३१ कसोटी सामन्यात एकूण ४३४ विकेट्सचा आकडा गाठला होता. कसोटीतील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कपिल यांचा विश्वविक्रम सहा वर्षानंतर वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्शने मोडला. पण, कपिल यांच्या शेवटच्या सामन्याला इतर २ गोष्टींनीही अविस्मरणीय ठरवले होते.
एक म्हणजे, या सामन्यात न्यूझीलंडकडून ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला २० वर्षांचा मुलगा ‘स्टीफन फ्लेमिंग’. कपिल यांचा शेवटचा सामना हा फ्लेमिंगचा कसोटीतील पहिलाच सामना होता. यावेळी ९२ धावा करत तो सामनावीर ठरला आणि पदार्पणाच्या सामन्याला अविस्मरणीय बनवले. पुढे जाऊन फ्लेमिंग न्यूझीलंडचा यशस्वी कर्णधार बनला. निवृत्तीनंतर फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
दुसरी म्हणजे, फ्लेमिंगपेक्षा काही आठवड्यांनी लहान असणारा सचिन तेंडुलकर याचा तो ३२वा कसोटी सामना होता. या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात सचिनने ४७ चेंडूंवर ४३ धावा केल्या होत्या. यासह सचिनने कसोटीतील त्याच्या २००० धावा पूर्ण केल्या होत्या. पुढे जाऊन सचिनने कसोटीत २०० सामने खेळत १५९२१ धावा केल्या.
हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचा ट्विटर आयडी- @Maha_Sports