मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकनं विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. शनिवारी (18 जानेवारी) वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकनं विदर्भाचा 36 धावांनी पराभव केला. कर्नाटकचं हे पाचवं जेतेपद आहे. यापूर्वी संघानं 2013-14, 2014-15, 2017-18, 2019-20 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे, विदर्भ पुन्हा एकदा आपल्या पहिल्या विजेतेपदापासून हुकला.
अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकनं रविचंद्रन स्मरणच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 348 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा डाव 48.2 षटकांत 312 धावांवर संपुष्टात आला. संघाकडून ध्रुव शोरेनं 111 चेंडूत 110 धावा केल्या. कर्नाटककडून वासुकी कौशिक, प्रसिद्ध कृष्णा आणि अभिलाष शेट्टी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर हार्दिक राजला एक विकेट मिळाली.
अंतिम सामन्यात 349 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाकडून ध्रुव शोरेनं शतक झळकावलं. या स्पर्धेतलं हे त्याचं तिसरं शतक आहे. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. शोरे व्यतिरिक्त हर्ष दुबेनंही मोठी खेळी केली. त्यानं 30 चेंडूत 63 धावा केल्या. करुण नायर (27) बाद झाल्यानंतर विदर्भाच्या मधल्या फळीवर दबाव आला.
विदर्भानं एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेत त्यांच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या मोठ्या खेळीमुळे मधल्या फळीला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. अंतिम सामन्याच्या दबावाखाली त्याची फलंदाजी कोसळली. शोरेने एका टोकावरून काही सुंदर फटके मारले आणि नायरसोबत 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अनुभवी जितेश शर्मा (34) सोबत 62 धावांची भागीदारी झाली. मात्र विदर्भाला मधल्या षटकांमध्ये जास्त धावा करता आल्या नाही, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला.
कर्नाटककडून रविचंद्रन स्मरणनं 92 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्यानं यष्टिरक्षक-फलंदाज कृष्णन श्रीजित (74 चेंडूत 78) सोबत चौथ्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मरननं अभिनव मनोहर (42 चेंडूत 79 धावा) सोबत पाचव्या विकेटसाठी 106 धावांची आक्रमक भागीदारी केली आणि कर्नाटकला 350 च्या जवळ नेलं.
अंतिम सामन्यात मयंक अग्रवालनं 32, देवदत्त पडिकलनं 8, केव्ही अनिशनं 21, हार्दिक राजनं नाबाद 12 आणि श्रेयस गोपालनं नाबद 3 धावा केल्या. विदर्भाकडून दर्शन नालकांडे आणि नचिकेत भुते यांनी प्रत्येकी दोन तर यश ठाकूर आणि यश कदम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड झाल्यानंतर रिषभ पंतला मिळाली आणखी एक मोठी जबाबदारी, लवकरच होईल घोषणा
चक दे इंडिया! भारताची खो-खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये एंट्री, चॅम्पियन बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर
Champions Trophy; बुमराह, हार्दिक असताना शुबमन गिल उपकर्णधार का?