मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स मंगळवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आमने-सामने आले होते. या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२०चा २०वा सामना झाला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने युवा खेळाडू कार्तिक त्यागीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यामुळे त्याचे आयपीएल पदार्पणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
८ नोव्हेंबर २००० रोजी उत्तर प्रदेशच्या हापुड शहरात जन्मलेल्या या वेगवान गोलंदाजाने पदार्पणाच्या आयपीएल सामन्यातील आपल्या पहिल्या षटकातच कमाल केली. झाले असे की, कर्णधार स्मिथने त्याला डावातील ५वे षटक टाकण्यासाठी पाठवले. दरम्यान त्याने ५व्या षटकातील ५व्या चेंडूवर मुंबईच्या क्विंटन डी कॉकला जोस बटलरच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे डी कॉक १५ चेंडूत फक्त २३ धावा करत पव्हेलियनला परतला.
असे असले तरी, पुढे त्यागीला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. पण त्याने पूर्ण डावात ४ षटके टाकत केवळ ३६ धावा दिल्या.
या १९ वर्षीय गोलंदाजाने यावर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्याच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील शानदार प्रदर्शनाला पाहता आयपीएल २०२० लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने १.३ कोटी रुपयांना त्याला संघात विकत घेतले होते.
कार्तिकला आयपीएलपर्यंतचा प्रवास गाठण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने खूप साहाय्य केले होते. रैनाच्या शिफारशीमुळे त्यागीला उत्तर प्रदेश रणजी ट्रॉफी संघात स्थान मिळाले होते. तसेच वेगवान गोलंदाज प्रविण कुमारनेही रैनाचे समर्थन करत त्यागीला पाठिंबा दिला होता.
एका मुलाखतीत रैनाविषयी बोलताना त्यागी म्हणाला होता की, “मी रैनाचे योगदान कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा मी १६ वर्षांखालील संघाकडून क्रिकेट खेळू लागलो होतो, तेव्हा रैनाने मला रणजी ट्रॉफी शिबिरमध्ये सगभागी होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काही दिवस माझ्या खेळीचे निरीक्षण केल्यानंतर रैनाने स्वत: निवडकर्त्यांना मला रणजी ट्रॉफी संघात स्थान देण्यासाठी विनंती केली होती.”
रैनामुळे त्यागीने २०१७ साली १६ वर्षे ११ महिन्यांच्या वयात रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र पुढे दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला काही काळासाठी विराम लागला. परंतु, दुखापतीतून सावरल्यानंतर त्यागीने पुनरागमन केले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. कार्तिकने इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान इत्यादी संघांविरुद्ध उत्तम प्रदर्शन केले.
तसेच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५ सामने खेळत ९ विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही एका सामन्यात त्याने ३ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आर्चरचा ‘तो’ एक चेंडू पडला असता महागात, लाखो भारतीयांच्या काळजाचा उडला टवका
लोटांगण.. सपशेल लोटांगण!! ‘या’ गोलंदाजांपुढे रोहितला येते गिरकी, पाहा काय आहे रेकॉर्ड
रबाडाची गेल्या १९ आयपीएल सामन्यातील कामगिरी पाहून तूम्हीही म्हणाल ‘कमाल!’
ट्रेंडिंग लेख-
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश