विदर्भाचा कर्णधार करुण नायरनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्यानं विकेट न गमावता लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. 3 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश आणि विदर्भ यांच्यात झालेल्या सामन्यात त्यानं ही कामगिरी केली. या सामन्यात त्यानं विजय हजारे ट्रॉफीमधील आपलं सलग तिसरं शतक झळकावलं. नायरनं लिस्ट ए क्रिकेटमध्ये सात शतकं ठोकली आहेत, ज्यापैकी गेल्या आठ दिवसांत त्यानं 4 शतकं झळकावली.
उत्तर प्रदेशविरुद्ध 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या करुण नायरनं 112 धावा केल्या. यावर्षी तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच आऊट झाला आहे. तो अटलबिहारी रायच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विदर्भाकडून सलामीवीर यश राठोडनंही शतक झळकावलं. राठोड आणि नायर यांच्यात 228 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे विदर्भानं हे अवघड लक्ष्य सहज गाठलं. नायरनं 70 धावा करताच तो लिस्ट ए मध्ये एकही विकेट न गमावता 500 धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
33 वर्षीय करुण नायर याविजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यानं स्पर्धेची सुरुवात जम्मू-काश्मीरविरुद्ध नाबाद 112 धावा करून केली. यानंतर तो छत्तीसगडविरुद्ध 44 धावांवर नाबाद राहिला. यानंतर नायरनं सलग शतकं झळकावली. त्यानं चंदीगडविरुद्ध 163 धावांची धमाकेदार नाबाद खेळी खेळली. यानंतर त्यानं तामिळनाडूविरुद्ध 111 धावांची शानदार नाबाद खेळी खेळून संघाला ‘ई’ गटात पहिल्या क्रमांकावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या खेळीसह करुण नायरनं लिस्ट ए क्रिकेटमधील 13 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिननं 2010 मध्ये एकही विकेट न गमावता 527 धावा करून हा विक्रम केला होता. भारतासाठी कसोटीत तिहेरी शतक झळकावलेल्या करुण नायरला दीर्घकाळापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे. आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 50 लाख रुपयांना विकत घेतलं.
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडू पाकिस्तानसमोर दाखवला दम, ठोकले झंझावाती शतक
रोहित शर्माला ड्रॉप केल्यामुळे भावूक झाला रिषभ पंत; म्हणाला, “हा असा निर्णय…”
जसप्रीत बुमराहवर कामाचा ताण वाढतोय, मालिकेत आतापर्यंत टाकले इतके चेंडू; आकडा धक्कादायक!