---Advertisement---

IND vs ENG: करूण नायरचा पत्ता कटणार? भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी 2 मोठे दावेदार सज्ज!

On: शनिवार, जुलै 19, 2025 10:00 PM
---Advertisement---

Karun Nair: भारतीय संघाचा स्टार फलंदाज करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. याच कारणामुळे त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले होते. त्यामुळे, तो इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करेल अशी सर्वांना आशा होती, परंतु त्याला तसे करता आले नाही. इंग्लंडमध्ये मिळालेल्या संधींचे तो पूर्णपणे सोने करू शकला नाही. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही.

करुण नायर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फक्त 20 धावा करू शकला. या कसोटीच्या पहिल्या डावात तर तो खातेही न उघडता तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने क्रीजवर टिकण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला. उसळणारे चेंडू त्याच्यासाठी अडचणीचे ठरले आणि तो इंग्लिश गोलंदाजांचा सोपा शिकार बनला. दुसऱ्या कसोटीत त्याने 31 आणि 26 धावा केल्या.

तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करुण नायरवर मोठी खेळी करण्याची जबाबदारी होती, परंतु तो सपशेल फ्लाॅप ठरला. पहिल्या डावात त्याने 40 धावा, तर दुसऱ्या डावात 14 धावा केल्या. तो संघासाठी कमकुवत दुवा ठरत आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने 3 कसोटी सामन्यांत एकूण 131 धावा केल्या आहेत. त्यामुळे, आता चौथ्या कसोटी सामन्यातून त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा घेण्यासाठी भारतीय कसोटी संघात साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन हे दोघेही दावेदार म्हणून उपस्थित आहेत.

1) अभिमन्यू ईश्वरन- अभिमन्यू ईश्वरननेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत भारतीय संघात प्रवेश मिळवला होता, परंतु त्याला अद्याप भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. 29 वर्षीय ईश्वरनने 103 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 7,841 धावा केल्या आहेत, ज्यात 27 शतके आणि 31 अर्धशतके आहेत. याशिवाय, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने 3,857 धावा केल्या आहेत.

2) साई सुदर्शन- दुसरीकडे, साई सुदर्शनने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, परंतु तो दोन्ही डावांमध्ये मिळून फक्त 30 धावाच करू शकला. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले होते. आता कर्णधार शुबमन गिल त्याला आणखी एक संधी देऊ शकतो. सुदर्शनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1,987 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. याशिवाय, 28 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1,396 धावा आहेत.

भारत-इंग्लंड संघातील चौथ्या कसोटी सामन्याला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असणार आहे. परंतु, चौथ्या कसोटी सामन्यात करूण नायरला वगळले जाणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---