---Advertisement---

बिनबाद ७०९ धावा करणारे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ

KC Ibrahim
---Advertisement---

इंग्रजांनी भारतात ज्या वेळी क्रिकेट आणले त्यावेळी श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात फक्त राजेरजवाडे भाग घेत. कालांतराने सैन्य क्रिकेट खेळू लागले आणि पाहता पाहता संपूर्ण भारताला या खेळाने वेड लावले. तेव्हाचे बॉम्बे म्हणजेच आत्ताची मुंबई या खेळाचे भारतातील माहेरघर बनत गेले. मुंबईने भारताला आणि जगाला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू दिले. त्याच ‘बॉम्बे स्कूल क्रिकेट’च्या एका क्रिकेटपटूचा आज (२६ जानेवारी) वाढदिवस आहे.

हे क्रिकेटपटू एक विलक्षण फलंदाज होते. परंतु, त्यांची कारकीर्द खूपच लहान राहिली आणि भारत-पाकिस्तान फाळणीमुळे ते जास्त क्रिकेट खेळू शकले नाहीत. त्यांनी भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, नंतर ते क्रिकेट सोडून पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले आणि पुन्हा कधीही क्रिकेट खेळले नाहीत. ‘केसी इब्राहिम’ असे या खेळाडूचे नाव आहे.

त्यांचा जन्म २६ जानेवारी १९१९ रोजी बॉम्बे म्हणजेच आजच्या मुंबईत झाला. खानमोहम्मद कुसुमभॉय इब्राहिम असे त्यांचे पूर्ण नाव होते. १९४८-१९४९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी भारतासाठी चार कसोटी सामने खेळले होते. २००७ मध्ये कराची येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी ते भारताकडून खेळलेले सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते.

पदार्पणाच्या सामन्यात केली होती चमकदार कामगिरी
इब्राहिम यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांना विनू मंकड यांच्यासह सलामीची जबाबदारी मिळाली. दिल्ली येथे झालेल्या या कसोटी सामन्यात त्यांनी ८५ आणि ४४ धावांच्या जबरदस्त खेळ्या खेळल्या. पण पुढच्या तीन कसोटी सामन्यात त्यांची बॅट शांत राहिली. पुढच्या सहा डावांमध्ये मिळून त्यांना केवळ ४० धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर काही काळ भारताचा एकही दौरा झाला नाही.

पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ
अखेर १९५१-१९५२ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला; तत्पुर्वीच इब्राहिम यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणदे १९५० मध्ये क्रिकेट सोडले होते. त्यानंतर ते पाकिस्तानात गेले. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान राहिलेल्या बेस्ट मोहम्मद अली जिना यांचा नात्यातील एका मुलीशी विवाह करून त्यांनी पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अखेरपर्यंत ते पाकिस्तानातच राहिले. ते पाकिस्तानात स्थायिक झाले होते आणि तेथेच व्यवसायात त्यांनी आपले बस्तान बसवले होते.

केल्या होत्या बिनबाद ७०९ धावा
इब्राहिम हे वरच्या फळीत फलंदाजी करत. १९३८-१९३९ च्या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. मात्र, सुरुवातीची दोन वर्षे त्यांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर १९४१-१९४२ च्या हंगामापासून त्यांनी धावांचा रतीब घालण्यास सुरुवात केली. त्यांना लवकरच मुंबईच्या वरिष्ठ संघात नियमित स्थान मिळाले आणि त्यांनी २३० धावांची नाबाद खेळी साकारली. त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून ११७ धावा केल्या.

१९४७-१९४८ पर्यंत इब्राहिम यांचे नशीब जोरावर होते. या हंगामात त्यांनी १६७.२९ च्या अविश्वसनीय सरासरीने ११७१ धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. या हंगामात त्यांनी बाद न होता ७०९ धावा केल्या होत्या. या कालावधीत त्यांच्या धावसंख्या २१८ नाबाद, ३६ नाबाद, २३ नाबाद, ७७ आणि नाबाद ११४ अश्या होत्या. या कामगिरीमुळे ते वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटर म्हणून निवडले गेले होते.

वयाच्या ३१ व्या वर्षी सोडले क्रिकेट
केसी इब्राहिम हे सलग दोन सामन्यात सलामीवीर म्हणून दुहेरी शतक ठोकणारे व अखेरपर्यंत नाबाद राहणारे एकमेव क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या नेतृत्वात बॉम्बेने १९४८ मध्ये रणजी करंडक जिंकला. या अंतिम सामन्यात त्यांनी २१९ धावा केल्या होत्या. त्यांनी खेळलेल्या चार आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २१.१२ च्या सरासरीने १६९ धावा केल्या. परंतु, ६० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांची सरासरी ६१.२४ अशी होती. त्यांच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४७१६ धावा आहेत. ज्यामध्ये १४ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

युवी चाहत्यांसाठी गुड न्यूज! सिक्सरकिंग बनला ‘बाप’माणूस, घरी आला ज्यूनिअर युवराज

“ज्याने कर्नाटकचे नेतृत्व केले नाही त्याला भारताचा कर्णधार केले”

झुंजार पुनरागमनासह तेलगू टायटन्सने खेळला टाय! हरियाणा स्टीलर्स तिसऱ्या स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---