गोवा ४ फेब्रुवारी : तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेडवर २-१ असा निसटता विजय मिळवत केरला ब्लास्टर्सनी हिरो इंडियन सुपर लीगच्या आठव्या हंगामात पुन्हा विजयी मार्गावर परतताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. केरलाने पूर्ण तीन गुण वसूल केले तरी प्रतिस्पर्ध्यांनी चुरशीचा खेळ करत सर्वांची मने जिंकली.
टिळक मैदान स्टेडियमवर झालेल्या रंगतदार लढतीत शुक्रवारी उत्तरार्धातील शेवटच्या ४० मिनिटांत झालेले दोन गोल केरलासाठी निर्णायक ठरले. ६२व्या मिनिटाला जॉर्ज डियाझने हरमनजोत खाब्राच्या मदतीने गोलाचे खाते उघडले. निशू कुमारच्या डाव्या बाजूकडील डीप क्रॉसला हरमननने गोलपोस्टच्या दिशेने अक्रॉस दिशा दाखवली. त्यावर डियाझने कुठलीही चूक केली नाही. त्याच्या अचूक हेडरपुढे नॉर्थ ईस्टचा गोलकीपर आणि कर्णधार सुभाशिषही अवाक झाला. मात्र, हा गोल सुदैवी ठरला, असे म्हणता येणार नाही. केरला ब्लास्टर्सच्या स्ट्रायकर्सनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. डियाझच्या गोल आधी म्हणजेच ६१व्या मिनिटाला अड्रियन लुना याने मारलेला हेडर गोलपोस्टपासून वाइड गेला.
डियाझच्या गोलने आत्मविश्वास उंचावलेल्या केरला ब्लास्टर्सनी आक्रमण आणखी तेज केले. मात्र, ७०व्या मिनिटाला आयुष अधिकारीला दुसरे यलो कार्ड (रेड कार्ड) मिळाल्याने उर्वरित अर्ध्या तासात केरला संघाला दहा फुटबॉलपटूंसह खेळावे लागले. तरीही त्यांची आक्रमक फळी तुफानी खेळली. ८२व्या मिनिटाला अल्वारो वॅझ्केझ याने केरला ब्लास्टर्सच्या गोलसंख्येत भर घातली. मध्यावरून चेंडूवर ताबा घेत त्याने गोलजाळीच्या दिशेने कूच केली. समोर केवळ गोलकीपर सुभाशिष होता. फटका आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्याने मागे जात उजव्या बाजूने डाइव्ह मारला. मात्र, रॉयचा फटका अचूक ठरला.
दोन गोलांनी पिछाडीवर पडूनही नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या खेळाडूंचे मनोबल खचले नाही. निर्धारित वेळ पूर्ण होण्याआधी काही सेकंद मोहमेद इर्शादने अप्रतिम गोल करताना आघाडी कमी केली. हा गोल करण्यात त्याला हर्नर संतानाची मदत झाली. मात्र, त्याचे प्रयत्न थिटे पडले. जादा वेळेतील उर्वरित मिनिटे सुरेख बचाव करत केरला ब्लास्टर्सनी २-१ असा निसटता विजय मिळवला. तसेच तीन गुण वसूल केले. पहिल्या सत्रासह मध्यंतरानंतरच्या दहा मिनिटांच्या खेळात केरलाचे पारडे थोडे जड राहिले तरी नॉर्थ ईस्ट युनायटेडनेही सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे केरलाचे लवकर आघाडी घेण्याचे प्रयत्न फसले.
शुक्रवारच्या विजयासह केरला ब्लास्टर्स संघ विजयीमार्गावर परतला. १३ सामन्यांतील सहावा विजय नोंदवताना त्यांनी २३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. आठव्या हंगामात अव्वल स्थानी असलेला हैदराबाद एफसी (१४ सामन्यांत २६ गुण) आणि त्यांच्यात केवळ ३ गुणांचा फरक आहे. दुसरीकडे, सलग दुसऱ्या आणि १६ सामन्यांतील दहाव्या पराभवानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेड (१० गुण) तळाला कायम आहे.
निकाल : केरला ब्लास्टर्स एफसी २(जॉर्ज डियाझ-६२व्या मिनिटाला, अल्वारो वॅझ्केझ-८२व्या मिनिटाला) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड १(मोहमेद इर्शाद, ९०व्या मिनिटाला)