गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सेमीफायनल टू सेकंड लेग सामन्याद्वारे मंगळवारी (१५ मार्च) केरला ब्लास्टर्स एफसी आणि जमशेदपूर एफसी पुन्हा आमनेसामने आहेत. पहिल्या लेगमधील निसटत्या विजयानंतर टिळक मैदानावर होणाऱ्या लढतीत केरला संघाला फायनल प्रवेशाची संधी चालून आली आहे. दुसरीकडे, शील्ड विजेत्या जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकपदाखालील जमशेदपूरसाठी आठवा हंगाम सर्वोत्कृष्ट हंगाम ठरला. यंदाच्या हंगामामध्ये प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला क्लब तसेच आयएसएलमध्ये सर्वाधिक आणि विक्रमी गुण (२० सामन्यांत ४३ गुण) मिळवणारा संघ असे अनेक विक्रम त्यांनी आपल्या नावे केला. सर्वाधिक १३ विजय आणि सर्वाधिक गुणांसह जमशेदपूरने मानाची आणि प्रतिष्ठेची लीग शील्ड ट्रॉफी जिंकली. त्यामुळे ‘नंबर वन’ जमशेदपूरकडे यंदाच्या हंगामातील जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, सेमीफायनल वन फर्स्ट लेगमध्ये त्यांना चौथ्या क्रमांकावरील केरला ब्लास्टर्सकडून ०-१ असा पराभवाचा धक्का बसला. सहल समदने ३८व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.
बाद फेरीची सुरुवात अपयशी झाली तरी आम्ही आमचा अप्रोच बदलणार नाही. आम्ही केवळ विजयासाठी खेळतो, हे आमच्या सपोर्ट स्टाफसह प्रत्येक चाहत्याला ठाऊक आहे. अंतिम फेरी गाठायची असेल तर किमान २-१ अशा फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यादृष्टीनेच आम्ही मैदानात उतरू. आम्ही प्रतिस्पर्धी संघाला कधीही कमी लेखत नाही. मात्र, त्यांच्या कमकुवत बाबींचा अधिक विचार करण्यापेक्षा मागील चुका टाळून सांघिक कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करू, असे जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी सांगितले. पहिल्या लेगमध्ये समदचा गोल महत्त्वपूर्ण ठरला तरी जमशेदपूरलाही गोल करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. डॅनियल चिमा चुक्वु हा दोनदा चुकला. ग्रेग स्टीवर्ट सातत्य राखू शकला नाही. मात्र, मंगळवारच्या सामन्यात या दुकलीसह प्रत्येक खेळाडू मैदानावर शंभर टक्के योगदान देईल, असा विश्वास कॉयल यांनी व्यक्त केला.
साखळीतील सर्वोत्तम कामगिरी पाहता पहिल्या लेगमध्ये जमशेदपूरविरुद्ध केरलासमोर खेळ उंचावण्याचे आव्हान होते. त्यांनी खेळ उंचावताना जमशेदपूरची सलग सात विजयांची मालिका खंडीत केली. शुक्रवारच्या विजयासह त्यांनी साखळी फेरीतील परतीच्या लढतीतील पराभवांचा बदला घेतला. अव्वल संघाविरुद्धच्या विजयामुळे केरला ब्लास्टर्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा त्यांना परतीच्या लढतीत होईल.
सहल समदने पहिल्या लेगमध्ये अप्रतिम गोल करताना केरला ब्लास्टर्सला आघाडीवर नेले. यासह आठव्या हंगामामध्ये भारताचा खेळाडू म्हणून सर्वाधिक (६ गोल) करण्यात संयुक्तरित्या दुसरा क्रमांक मिळवला. यात लिस्टन कोलॅको (८ गोल) आघाडीवर आहे. समदला अन्य सहकाऱ्यांचीही चांगली साथ लाभली आहे.
पहिल्या लेगमध्ये आम्ही चांगला खेळ केला. त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. मात्र, त्या निकालाचा आम्ही फार विचार करत नाही. दुसऱ्या लेगमध्ये जमशेदपूरविरुद्ध खेळताना आम्ही ०-० अशा स्कोअरशीटने सुरुवात करू. विजयी आघाडीनंतर सर्वांच्या आमच्याकडून अपेक्षा उंचावल्यात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मात्र, कुठल्याही संघाला हरवण्याची धमक आमच्यात आहे, असे आम्ही दाखवून दिले, असे केरला ब्लास्टर्सचे प्रशिक्षक वुकोमॅनोविक यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक
हैदराबाद एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज ‘रॉयल’ युद्ध!