लंडन। विंबल्डन 2018 च्या महिला एकेरी स्पर्धेत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने 23 वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभूत करत पहिल्यांदाच विंबल्डनचे विजेतेपद मिळवले आहे.
1 तास 6 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात कर्बरने सेरेनाला 6-3,6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपदही मिळवले.
या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कर्बरने सांगितले की ती सामन्याआधी थोडी नर्व्हस होती. तसेच सेरेना विरुद्ध सामना असल्याने तिला तिचे सर्वोत्तम द्यायचे होते.
त्याचबरोबर कर्बर म्हणाली, “मला वाटले हे खूप मस्त आहे. मला भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीयेत. कारण मी लहान असताना या क्षणाचे स्वप्न पाहिले होते. विंबल्डन जिंकणे हे माझ्या कारकिर्दीत खास असेल.”
कर्बर विंबल्डनचे विजेतेपद मिळवणारी जर्मनीची स्टेफी ग्राफ नंतरची दुसरीच महिला टेनिसपटू ठरली आहे. ग्राफने शेवटचे विंबल्डनचे विजेतेपद 1996 ला मिळवले होते. तिने एकूण 7 विंबल्डन विजेतेपदे जिंकली आहेत.
सेरेना विरुद्ध कर्बर यांच्यातील मागील तीन सामने हे ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतच झाले आहेत. कर्बरने याआधी 2016 मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच तिला 2016 मध्ये सेरेनानेच विंबल्डनच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते.
सेरेनाने सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. तीने यावर्षी पार पडलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र तीला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.
Following in great footsteps 🇩🇪@AngeliqueKerber beats Serena Williams 6-3, 6-3 to become the first German to win a #Wimbledon singles title since Steffi Graf in 1996 🏆#TakeOnHistory pic.twitter.com/UwmpYbXZyR
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
विंबल्डनमध्ये 15 जुलैला नोव्हाक जोकोविच विरुद्ध केविन अँडरसन यांच्यात पुरुष एकेरीची अंतिम फेरी रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकवेळ टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला खेळाडू भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक
–विंबल्डन २०१८: राफेल नदालला पराभूत करत नोव्हाक जोकोविचचा अंतिम फेरीत प्रवेश