क्रिकेटच्या वनडे विश्वचषकाचे तापमान आता चांगलेच वाढू लागले आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिवस शिल्लक असताना, या आधीच्या विश्वचषकामध्ये घडलेल्या काही अशा घटना आहेत ज्या इतिहासात कायमच्या नोंद झाल्या आहेत. असाच एक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहलेला सामना म्हणजे 2011 विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध आयर्लंड सामना. या सामन्यात असं काय घडलेलं हे आपण जाणून घेऊया.
आयर्लंडने 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा भाग घेतलेला. आपल्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये त्यांनी पाकिस्तानला हरवत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवलेला. तर सुपर 8 मध्ये देखील बांगलादेशला हरवून खळबळ उडवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंड आपले पाय भक्कमपणे रोवत होती. अशा त्यांनी 2011 वर्ल्डकपमध्ये देखील सहभाग नोंदवला. आपल्या सलग दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये देखील त्यांनी अपसेट घडवून आणलाच.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात त्यांना बांगलादेश कडून निसटता पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांचा सामना झाला आपलेच शेजारी असलेल्या आणि आयर्लंड क्रिकेटला या स्तरावर आणण्यात मदत केलेल्या इंग्लंडशी. सामन्याचे ठिकाण होते बेंगलोरचे चिन्नास्वामी स्टेडियम.
चिन्नास्वामी स्टेडियम म्हटल्यावर धावांचा पाऊस पडणार हे नक्की होते. सलामीला आलेल्या केविन पीटरसनने फिफ्टी मारली. जोनाथन ट्रॉटने 92 आणि इयान बेलने 81 धावा कुटत इंग्लंडला 327 पर्यंत मजल मारून दिली. पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध टाय खेळलेल्या इंग्लंडसाठी ही धावसंख्या विजय मिळवण्यासाठी पुरेशी दिसत होती. मात्र, क्रिकेटदेवतेच्या मनात दुसरच काही असावं.
जेम्स अँडरसनने कॅप्टन विल्यम्स पोर्टरफिल्डला पहिल्याच चेंडूवर बाद करत इंग्लंडला स्वप्नवत सुरुवात दिली. इंग्लंडच्या पुढच्या फलंदाजांनी तिशीतील धावसंख्या केल्या. आयर्लंड 22.2 षटकांत 4 बाद 106 अशा अवस्थेत असताना मैदानात उतरला केविन ओब्रायन. सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरलेला केविनने जे काही केले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
अँडरसन, ब्रॉड, स्वान, यार्डी यांच्यासारखे एक से बढकर एक गोलंदाज असताना त्याने त्यांची अक्षरशः पिसे काढली. फक्त 50 चेंडूमध्ये त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या आणि प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. फक्त 63 चेंडूमध्ये 13 चौकार आणि सहा उत्तुंग षटकार मारत 113 धावा तडकावल्या. दोन षटकात अकरा धावांची गरज असताना तो बाद झाला. मात्र, मुनी आणि जॉन्सनने काही अघटीत घडणार नाही याची काळजी घेत 5 चेंडू आधीच संघाचा ऐतिहासिक विजय साकारला.
आयर्लंडला त्यानंतर विश्वचषकात फारसं काही धडाकेबाज करता आलं नाही. 2015 ला वेस्ट इंडीजला हरवण्याची किमया त्यांनी केली. तीन विजय त्यांनी मिळवले पण क्वार्टर फायनलची संधी खराब रनरेटमुळे हुकली. आता तर सलग दोन विश्वचषकासाठी ते पात्रही ठरू शकले नाहीत. मात्र, वनडे वर्ल्डकप आणि आयर्लंड क्रिकेट यांचा उल्लेख झाला की केविन ओब्रायन हे नाव देखील आपसूकच तोंडावर येते.
(Kevin O’Brien Helps Ireland To Beat England In 2011 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
सेट झालेल्या स्मिथचा त्रिफळा, शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज गुडघ्यांवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा