यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर न्यूझीलंडने १-० अशा फरकाने ताबा मिळवला. साऊथम्पटन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवशीच न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंड संघाने तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. तर, इंग्लंडला २०१३ नंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली. संघाच्या खराब कामगिरीनंतर माजी कर्णधार केविन पीटरसन याने संघाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
या कारणाने झाला पराभव
लॉर्ड्स येथील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात उतरले. सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही पाहुण्या न्यूझीलंडने इंग्लंडला अजिबात संधी न देता चौथ्या दिवशी सकाळीच सामन्यात विजयश्री मिळवली. या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध होत असलेला केविन पीटरसन याने ट्विट करून इंग्लंड संघाची कानउघडणी केली.
पीटरसनने इंग्लंड संघाची कसोटीतील कामगिरी का खालावत आहे याचा देखील खुलासा केला. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले,
‘जेव्हापासून फ्रॅंचाईजी टी२० क्रिकेटला सुरुवात झाली आहे तेव्हापासून कोणताही उत्कृष्ट खेळाडू काउंटी चॅम्पियनशिपचा संपूर्ण हंगाम खेळला नाही. काउंटी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच कालावधी जात असल्याने त्याचा परिणाम कसोटीतील फलंदाजीवर होतोय.’
https://twitter.com/KP24/status/1404036584572338179?s=19
इंग्लंडने केली ढिसाळ फलंदाजी
कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात रॉरी बर्न्स वगळता कोणत्याही दुसर्या फलंदाजांनी इंग्लंडसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली नाही. त्याच्या व्यतिरिक्त केवळ डॅन लॉरेन्स हाच अर्धशतक काढू शकला. कर्णधार जो रूट, झॅक क्राऊली, ओली पोप व जेम्स ब्रेसी हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तसेच, गोलंदाजीतही नेहमीप्रमाणे धार दिसली नाही. केवळ मार्क वूड न्यूझीलंड फलंदाजांना थोडाफार त्रासदायक ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर फाफ डू प्लेसिसच्या पत्नीने शेअर केली भावूक करणारी पोस्ट
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘हे’ दोघे असणार राहुल द्रविडचे साथीदार
शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना कधीच खेळणार नाही पहिला चेंडू; ‘हे’ आहे कारण