पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १७ वषार्खालील चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ०.५६ सेकंदात पार केले. केरळ (३ मिनिटे ५४.६८ सेकंद) व तामिळनाडू (३ मिनिटे ५९.२८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. मुलांच्या विभागात महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. त्यांनी ही चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यत तीन मिनिटे २५.८९ सेकंदात पूर्ण केली.
केरळने ही शर्यत तीन मिनिटे २४.४५ सेकंदात जिंंकली. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने चार बाय चारशे मीटर्स रिले शर्यत तीन मिनिटे ४९.९५ सेकंदात जिंकली. या संघात निधीसिंग योगेंद्र, संगिता शिंदे, रोझलीन रुबेन व दुर्गा देवरे यांचा समावेश होता. मुलांमध्ये मात्र महाराष्ट्र संघास तांत्रिक कारणास्तव शर्यतीमधून बाद करण्यात आले.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या इंद्र्रजित फरकाटे याने आठशे मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. त्याने ही शर्यत एक मिनिट ५५.३८ सेकंदात पार केली. तामिळनाडूच्या बी.माथेश याने हे अंतर एक मिनिट ५३.८७ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राच्या शर्वरी परुळेकर हिने आपल्या संघास आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले. तिने १७ वषार्खालील गटात तिहेरी उडीचे सुवर्णपदक जिंकले. तिने १२.२२ मीटर्स अंतरापर्यंत उडी मारली. केरळच्या अनु मॅथ्यु हिने १२.०९ मीटर्सपर्यंत उडी मारली आणि रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या पूर्वा सावंत हिला ब्राँझपदकाची कमाई झाली. तिने १२.०७ मीटर्सपर्यंत उडी मारली. याच वयोगटात आदिती बुगड हिने थाळीफेकमध्ये ब्राँझपदक पटकाविले. तिने ३९.०८ मीटर्सपर्यंत थाळी फेकली. राजस्थानची किरण (४०.३२ मीटर्स) व हरयाणाची श्वोता सिंग (३९.६२ मीटर्स) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले.