पुणे। महाराष्ट्राच्या मुलींना बॅडमिंटनमध्ये निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. २१ वषार्खालील गटात पूर्वा बर्वे या स्थानिक खेळाडूला उत्तराखंडची खेळाडू उन्नती बिश्त हिने २१-१५, १७-२१, २१-१७ असे पराभूत केले. पूर्वा हिला येथे चौथे मानांकन देण्यात आले होते.
पूर्वा हिने दुसरी गेम घेत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. तथापि उन्नती हिच्या आक्रमक स्मॅशिंगपुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. त्यामुळे पूवार्चे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. मालविका बनसोड हिने मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळवित महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने केरळच्या आद्या वेरियाथ हिचा २१-१८, २१-९ असा पराभव केला. मालविका हिला द्वितीय मानांकन मिळाले आहे.
१७ वषार्खालील गटात उर्वी ठाकूरदेसाई या महाराष्ट्राच्या खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. तिला उत्तरप्रदेशच्या मानसी सिंग हिने २३-२१, २१-१३ असे सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. मानसी हिला येथे द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.
युवकांच्या २१ वषार्खालील विभागात अमन फारुक याने अपराजित्व राखले. त्याने उपांत्यपूर्व फेरीत दादरा नगरहवेली संघाच्या प्रणव प्रशांत याचा २१-५, २१-८ असा धुव्वा उडविला.