पुणे। महाराष्ट्राच्या चिन्मय सोमया याने टेबल टेनिसमध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकाविले. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या दिया चितळे हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुंबई येथील खेळाडू चिन्मय याने अंतिम फेरीच्या रंगतदार लढतीत दिल्लीच्या यश मलिक याच्यावर ११-५, ११-३, ११-६, ९-११, ५-११, ९-११, ११-३ असा रोमहर्षक विजय मिळविला. मुलींच्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेशच्या अनुशा कुटुंबले हिने दिया हिचा ११-३, ११-६, ११-१, ११-३ असा पराभव केला. मुलांमध्ये देव श्रॉफ तर मुलींमध्ये स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या खेळाडूंना ब्राँझपदक मिळाले.
चिन्मय हा कांदिवली येथील रहिवासी असून तो दररोज दीड तास प्रवास करीत ठाणे येथे शैलजा गोहाड यांच्या अकादमीत सरावास येतो. तो बालभारती महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिकत आहे. त्याने २०१६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सबज्युनिअर विभागात उपविजेतेपद पटकाविले होते. त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.
दिया ही मुंबई येथील खेळाडू असून तिने गतवर्षी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील एकेरीत ब्राँझपदक तर दुहेरी व सांघिक विभागात सुवर्णपदक मिळविले होते. ती आर्य विद्याामंदिर प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे.