पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळवित शनिवारी टेबल टेनिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या चिन्मय सोमया याने काल १७ वर्षाखालील एकेरीत अजिंक्यपद मिळविले होते. त्याने आज देव श्रॉफ याच्या साथीत दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मैनिक रॉय व सौम्यदीप सरकार यांचा ११-८, ११-७, ११-४ असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला.
पुण्यात म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुलींच्या १७ वर्षाखालील दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या खेळांडूंनी रिशा गोगोई व गार्गी गोस्वामी यांचा ११-४, ११-६, ११-० असा पराभव केला. दिया हिने काल एकेरीत उपविजेतेपद मिळविले होते.
मुलांच्या २१ वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे व रिगान अलबुकर्क यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्यांना गुजरातच्या मानुष शाह व ईशान हिंगोरानी यांनी ९-११, १०-१२, ११-६, ११-५, ११-७ असे पराभूत केले. पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर त्यांनी टॉपस्पीन फटके व प्लेसिंग याचा बहारदार खेळ करीत विजेतेपद खेचून आणले.