पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. शुक्रवार अखेर एकूण ७६ सुवर्ण, ५७ रौप्य आणि ६७ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ २०० पदकांसह आघाडी कायम राखली.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिस, टेबलटेनिस, मुष्टीयुद्ध खेळामध्ये यश मिळवित पदके मिळविली.
मुष्टीयुद्ध –
महाराष्ट्राने मुष्टीयुद्धात हरयाणा व मणीपूर यांचे आव्हानास यशस्वीरित्या सामोरे जात १७ वर्षालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
देविका हिने ४६ किलो गटात हरयाणाच्या तमन्ना हिच्यावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. तिने सुरुवातीपासूनच या लढतीवर नियंत्रण राखले होते. मितिका हिने ६६ किलो गटात हरयाणाच्या मुस्कान हिला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. लढतीमधील पहिल्या फेरीपासूनच तिने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळेच तीनही फेऱ्यांमध्ये तिचे वर्चस्व राहिले.
मुलांच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोम याने मिझोरामच्या जोरामुओना याच्यावर ४-१ अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. त्याने या लढतीत नियोजनबद्ध कौशल्य दाखविले. त्याचाच सहकारी शेखोमसिंग याने ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिंसांगा याचा दणदणीत पराभव केला. मितेई या महाराष्ट्राच्या खेळाडूने हरयाणाच्या यशवर्धनसिंग याला पराभूत केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक ठोसेबाजी करीत ही लढत जिंकली.
पुण्यातील नेहरू स्टेडियमवरील एमआयजीस अकादमीत शिकणाºया आकाश गोरखा याच्या लढतीबाबत उत्सुकता होती. त्याने ५७ किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या वंशिजकुमार याला शेवटपर्यंत चिवट लढत दिली. ही लढत तो जिंकणार असे वाटले होते. तथापि पंचांनी वंशिजकुमारच्या बाजूने निकाल दिला. महाराष्ट्राच्या लैश्रामसिंग यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ६० किलो गटात त्याला हरयाणाच्या अंकित नरवाल याने पराभूत केले.
टेनिस :-
महाराष्ट्राच्या गार्गी पवार हिने दुहेरीत सुवर्ण व एकेरीत ब्राँझपदक जिंकले आणि टेनिसमधील १७ वर्षाखालील गटात कौतुकास्पद कामगिरी केली. तिने दुहेरीत प्रेरणा विचारे हिच्या साथीत १७ वर्षाखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या अरमान भाटिया व ध्रुव सुनीश ही जोडी विजेती ठरली. महाराष्ट्राने या सुवर्णपदकांबरोबरच तीन रौप्य व एक ब्राँझपदकाचीही कमाई केली.
गार्गी हिने दुहेरीत प्रेरणाच्या साथीत महाराष्ट्राच्याच सई भोयार व ह्रदया शहा यांचा ६-१, ६-१ असा दणदणीत पराभव केला. त्यांनी पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करताना सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. तसेच त्यांनी नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. गार्गी हिने त्याआधी एकेरीत ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिच्यावर ६-३, ६-३ असा सफाईदार विजय मिळविला. तिने दोन्ही सेट्समध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांचा चौफेर खेळ केला. तसेच तिने बॅकहँडचेही सुरेख फटके मारले.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादव हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला अव्वल मानांकित खेळाडू महेक जैन हिने ६-४, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये महेक हिला मिहिका हिने चिवट झुंज दिली. तथापि दुसºया सेटमध्ये महेक हिच्या आक्रमक खेळापुढे मिहिका हिला प्रभाव दाखविता आला नाही.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात आर्यन भाटिया या महाराष्ट्राच्या खेळाडूला गुजरातच्या देव जेविया याच्यापुढे पराभव पत्करावा लागला. हा सामना देव याने ७-५, ६-३ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये आर्यन याने चांगला खेळ केला. तथापि दोन्ही सेट्समध्ये त्याची सर्व्हिसब्रेक करण्यात देव याला यश मिळाले.
आर्यन याचा मोठा भाऊ अरमान याने ध्रुव याच्या साथीत २१ वर्षाखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा २-६, ६-३, १०-६ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली.
टेबल टेनिस :-
महाराष्ट्राच्या चिन्मय सोमया याने १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकाविले. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या दिया चितळे हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुंबई येथील खेळाडू चिन्मय याने अंतिम फेरीच्या रंगतदार लढतीत दिल्लीच्या यश मलिक याच्यावर ११-५, ११-३, ११-६, ९-११, ५-११, ९-११, ११-३ असा रोमहर्षक विजय मिळविला. मुलींच्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेशच्या अनुशा कुटुंबले हिने दिया हिचा ११-३, ११-६, ११-१, ११-३ असा पराभव केला. मुलांमध्ये देव श्रॉफ तर मुलींमध्ये स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या खेळाडूंना ब्राँझपदक मिळाले.
तिरंदाजी :-
महाराष्ट्राच्या ईशा पवार हिने १७ वर्षाखालील मुलींच्या विभागात कपाउंड प्रकारात पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने या वयोगटातील प्राथमिक फेरीत ६८१ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. राजस्थानच्या प्रिया गुर्जर हिने ६८४ गुणांसह आघाडी घेतली आहे. निकेशा साखरी (पुडुचेरी), आर्शिया चौधरी व संचिता तिवारी (दिल्ली) यांनी अनुक्रमे तीन ते पाच क्रमांक घेतले आहेत.
मुलांच्या १७ वर्षाखालील कपाउंड प्रकारात महाराष्ट्राच्या प्रथमेश जावळे याने प्राथमिक फेरीत सातवे स्थान घेतले आहे. त्याचे ६७२ गुण झाले आहेत. दिल्लीचा ऋतिक चहाल याने ६९७ गुणांसह आघाडी मिळविली आहे.
मुलांच्या २१ वर्षाखालील कपाउंड प्रकारात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष व निखिल वासेकर यांनी प्राथमिक फेरीत अनुक्रमे ११ वे व १२ वे स्थान घेतले आहे. मुलींमध्ये महाराष्ट्राच्या ऋचा देशमुख हिने १५ वे स्थान घेतले आहे.
बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉल :-
महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुले या दोन्ही विभागात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मुलींच्या १७ वर्षाखालील गटातील उपांत्य फेरीत महाराष्ट्राला उत्कंठापूर्ण लढतीत पंजाबकडून ८०-७३ असा पराभव स्वीकारावा लागला.
पूर्वार्धात पंजाबकडे ३३-२० अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. त्यांच्याकडून हरसिमरान कौर हिने ३५ गुण नोंदवित महत्त्वाचा वाटा उचलला. कनिष्का धीर हिने १७ गुण नोंदवित तिला चांगली साथ दिली. महाराष्ट्राकडून सिया देवधर (२४ गुण) व सुझान पिन्टो (२० गुण) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली.
मुलांच्या २१ वर्षाखालील गटात तामिळनाडू संघाने महाराष्ट्राचा ७८-५७ असा सहज पराभव केला. पूर्वार्धात त्यांच्याकडे ३५-२८ अशी आघाडी होती. त्यांच्याकडून हरीराम (२१ गुण) व शेल्डान रोशन (१७ गुण) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. महाराष्ट्राच्या कर्णधार समीर कुरेशी याने २० गुण नोंदवित एकाकी झुंज दिली.
व्हॉलिबॉलमध्येही निराशा
महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉलपटूंना येथे निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्यांना २१ वर्षाखालील मुलींच्या गटात केरळने २५-१९, २५-१८, २५-२२ असे सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले.