पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. शुक्रवारअखेर ३२ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या संघाने ९१ पदकांसह आघाडी घेतली. दिल्लीचे खेळाडू २४ सुवर्ण पदकांसह ६१ पदकांनी द्वितीय आणि हरयाणा १८ सुवर्ण पदकांसह ६४ पदकांनी तृतीय क्रमांकावर होते.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्स आणि जलतरणामध्ये घवघवीत यश मिळवित पदकांची कमाई केली आहे.
अॅथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट
महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकर हिने मुलींच्या १७ वषार्खालील गटात शंभर मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. तिने हे अंतर १२.४८ सेकंदांत पार केले. २१ वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राच्या रश्मी शेरीगर हिला ब्राँझपदक मिळाले. तिने शंभर मीटर्सची शर्यत १२.२७ सेकंदात पार केली.
महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने २१ वषार्खालील गटात पाच हजार मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून लांब अंतराच्या शर्यतींमधील आपली हुकुमत सिद्ध केली. तिने हे अंतर १७ मिनिटे ५१ सेकंदात पार केले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात स्नेहा जाधव हिने हातोडा फेकीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने या प्रकारात ४६.९८ मीटर्सपर्यंत हातोडा फेकला. दिल्लीच्या वर्षा कुमार (४९.४० मीटर्स) हिने सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या किरण भोसले याला मात्र २१ वर्षाखालील गटात शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्याला ही शर्यत पार करण्यासाठी १०.९० सेकंद वेळ लागला.
मूळचा राजस्थानचा असलेला व सध्या येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेणाºया आदेश गरसा याने महाराष्ट्राच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदक नोंदविले. त्याने चारशे मीटर्स धावण्याची शर्यत ४८.७४ सेकंदात जिंकली.
अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदकाची जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात रौप्यपदक पटकाविले. तसेच १०० मीटर मुलींच्या गटात प्रांजली पाटील हिने रौप्यपदकाच्या कमाई केली.
अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील गटात अल्डेनने १४.१० सेकंदात अंतर पार करीत केरळचा सी मोहम्मद (१४.११ से.) व महाराष्ट्राचा अभिषेक उभे याला (१४.३२ से.) मागे टाकले. अभिषेकला कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.
मुलींमध्ये १७ वर्षाखालील गटात तामिळनाडूच्या थबीथा पी.एम. हिने १४.१४ सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील (१४.४९ से.) हिने रौप्यपदकाची कमाई केली.
चार बाय १०० मीटर्स रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना दुहेरी मुकुट
चार बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. १७ वर्षाखालील महाराष्ट्राच्या सुदेश्ना शिवणकर, हरिता भद्रा, आदिती परब, अवंतिका नरळे या मुलींनी हे अंतर ४८.३१ सेकंदात पार केले. तसेच २१ वर्षाखालील महाराष्ट्राच्या रोझलीन लेव्हीस, सिद्धी हिरे, रश्मी शेरीगर, किर्ती भोईटे या मुलींच्या संघाने ४७.२२ सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदकावर आपले नाव निश्चित केले. मुलांमध्ये १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंना (४४.८० से.) कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. तर, २१ वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघाने ४२.७९ से. अंतर पार करीत कास्यंपदक मिळविले.
बॅडमिंटनमध्ये संमिश्र यश
महाराष्ट्राच्या मुलींना बॅडमिंटनमध्ये निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. २१ वषार्खालील गटात पूर्वा बर्वे या स्थानिक खेळाडूला उत्तराखंडची खेळाडू उन्नती बिश्त हिने २१-१५, १७-२१, २१-१७ असे पराभूत केले. पूर्वा हिला येथे चौथे मानांकन देण्यात आले होते.
मालविका बनसोड हिने मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळवित महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने केरळच्या आद्याा वेरियाथ हिचा २१-१८, २१-९ असा पराभव केला. मालविका हिला द्वितीय मानांकन मिळाले आहे. युवकांच्या २१ वषार्खालील विभागात अमन फारुक याने अपराजित्व राखले. त्याने उपांत्यपूर्व फेरीत दादरा नगरहवेली संघाच्या प्रणव प्रशांत याचा २१-५, २१-८ असा धुव्वा उडविला.
जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णभरारी
जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने २१ वर्षाखालील गटातील साधन प्रकारांमध्ये वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने पॉमेल हॉर्स, समांतर बार, रोमन रिंग्ज आदी सर्वच प्रकारांमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले. त्याने ७३.५५ गुणांची कमाई केली.
तर, ओंंकार शिंदे या महाराष्ट्राच्याच खेळाडूने ब्राँझपदक घेताना घरच्या प्रेक्षकांना आणखी एका पदकाचा आनंद मिळवून दिला. त्याने ६९.४५ गुण नोंदविले. महाराष्ट्राच्या अनास नासिर व उत्कर्ष मोरणकर यांना अनुक्रमे सहावे व सातवे स्थान मिळाले.
ज्युदोत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
महाराष्ट्राच्या अपूर्वा पाटील व देवतिलक थापा यांनी ज्युदोत सुवर्णपदक मिळवित संघासाठी दुहेरी धमाका केला. अपूर्वा हिने १७ वर्षाखालील गटाच्या ६३ किलो विभागात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत दिल्लीच्या ज्योती टोकस हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला. ५८ किलो गटात मात्र महाराष्ट्राच्या गौतमी कांचन हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत दिल्लीच्या प्रेरणा टोकस हिने पराभूत केले.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात देवतिलक याने मणिपूरच्या थोंगजम अबुगम याच्यावर खळबळजनक विजय नोंदविला. त्याने ज्युदोचे सर्वोत्तम कौशल्य दाखवित हे विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकर याने ८१ किलो गटात ब्राँझपदकाची कमाई केली.
कुस्तीत महाराष्ट्राची सोनेरी हॅटट्रीक
महाराष्ट्राच्या मल्लांनी घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा घेत हरयाणाच्या मल्लांचे आव्हान मोडून काढले आणि कुस्तीत सोनेरी हॅट्ट्रिक साधली. फ्रीस्टाईल प्रकारात त्यांच्या वेताळ शेळके (८० किलो), महेश पाटील (५१ किलो) व सचिन दाताळ (६० किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांचे सहकारी संजय मिश्रा (७१ किलो) व अजय वाबळे (६५ किलो) यांना रौप्यपदक मिळाले तर कालीचरण सोलनकर (७१ किलो) याला ब्राँझपदक मिळाले. मुलींमध्ये स्वाती शिंदे हिने ब्राँझपदक जिंकले.
जलतरणात वेदांत व युगाची सोनेरी कामगिरी
वेदांत बापना व युगा बिरनाळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून जलतरणात नेत्रदीपक यश संपादन केले. त्याखेरीज महाराष्ट्राच्या अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे यांनी ब्राँझपदकाची कमाई केली.
मुंबईचा पंधरा वर्षीय खेळाडू वेदांत याने मुलांच्या १७ वर्षाखालील गटात १०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत एक मिनिट ०.१६ सेकंदात जिंकली. जलतरण सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या युगा हिने अपेक्षेप्रमाणे २१ वषार्खालील गटाच्या १०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने ही शर्यत एक मिनिट ०८.४६ सेकंदात जिंकली.
मुलींच्या १७ वषार्खालील गटात अनया वाला या मुंबईच्या खेळाडूला चारशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. २१ वषार्खालील मुलींच्या चारशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत ऋतुजा तळेगावकर (४ मिनिटे ५०.८४ सेकंद)हिला ब्राँझपदक मिळाले. मुलांच्या १७ वषार्खालील गटात साहिल गनगोटे या महाराष्ट्राच्या खेळाडूने चारशे मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यतीत ब्राँझपदक मिळविले. त्याने हे अंतर चार मिनिटे ५९.२० सेकंदात पूर्ण केले.
महाराष्ट्राच्या रिले संघाने अपेक्षेप्रमाणे २१ वषार्खालील महिलांच्या चार बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. युगा बिरनाळे, ऋतजा तळेगावकर, युक्ता वखारिया व साध्वी धुरी यांच्या संघाने हे अंतर चार मिनिटे १४.२१ सेकंदात पार केले. १७ वषार्खालील मुलींच्या चार बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ११.१९ सेकंदात पार केले.
वेटलिफ्टिंगमध्ये रुपा हनगंडी आणि रणजित चव्हाणचा सुवर्णवेध
महाराष्ट्रातील सांगलीची रुपा हनगंडी हिने २१ वर्षाखालील महिलांच्या ५९ किलो गटात सोनेरी वेध घेतला. तिने स्नॅचमध्ये ८३ किलो वजन उचलताना पश्चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदविलेला ८१ किलो हा विक्रम मोडला. तिने क्लीन व जर्कमध्ये १०३ किलो असे एकूण १८६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.
रणजित चव्हाण या महाराष्ट्राच्या खेळाडूने २१ वषार्खालील गटाच्या ७३ किलो वजन विभागात सोनेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १२५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५१ किलो असे एकूण २७६ किलो वजन उचलले.