पुणे। महाराष्ट्राने चार सुवर्ण, एक रौप्यपदक व नऊ कांस्यपदके मिळवित मुष्टीयुद्धात कौतुकास्पद कामगिरी केली. निखिल दुबे, बरुणसिंग, भावेशकुमार व हरिवंश तिवारी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या अजय पेंडोर याला रौप्यपदक मिळाले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. बरुणसिंग याने २१ वर्षाखालील विभागातील ४९ किलो गटात आपलाच सहकारी अजय पेंडोर याच्यावर शानदार विजय मिळविला. बरुणसिंग याने युवा जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच त्याने सात देशांच्या निमंत्रित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
याच वयोगटातील ५२ किलो गटात भावेश याने कर्नाटकच्या अन्वर याला पराभूत करीत सनसनाटी कामगिरी केली. अन्वर याने जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरिवंश तिवारी याने ६० किलो गटात हरयाणाच्या अंकित याला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. या लढतीत हरिवंश याने कोणतेही दडपण न घेता सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळेच त्याला ४-१ असा विजय मिळविता आला. अंकित याने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.