पुणे। महाराष्ट्राच्या ईशा पवार हिने १७ वर्षाखालील मुलींच्या विभागात कपाउंड प्रकारात पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने या वयोगटातील प्राथमिक फेरीत ६८१ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. राजस्थानच्या प्रिया गुर्जर हिने ६८४ गुणांसह आघाडी घेतली आहे. निकेशा साखरी (पुडुचेरी), आर्शिया चौधरी व संचिता तिवारी (दिल्ली) यांनी अनुक्रमे तीन ते पाच क्रमांक घेतले आहेत.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुलांच्या १७ वर्षाखालील कपाउंड प्रकारात महाराष्ट्राच्या प्रथमेश जावळे याने प्राथमिक फेरीत सातवे स्थान घेतले आहे. त्याचे ६७२ गुण झाले आहेत. दिल्लीचा ऋतिक चहाल याने ६९७ गुणांसह आघाडी मिळविली आहे.
मुलांच्या २१ वर्षाखालील कपाउंड प्रकारात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष व निखिल वासेकर यांनी प्राथमिक फेरीत अनुक्रमे ११ वे व १२ वे स्थान घेतले आहे. मुलींमध्ये महाराष्ट्राच्या ऋचा देशमुख हिने १५ वे स्थान घेतले आहे. ही स्पर्धा आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युट येथे सुरू आहे. विविध गटाच्या अंतिम फेरी शनिवारी व रविवारी होणार आहेत.