पुणे। मुष्टीयुद्धात करिअर करण्यास प्रारंभ केला तेव्हाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. हे ध्येय लवकरच मी साकार करीन, असा आत्मविश्वाास महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा निखिल दुबे याने व्यक्त केला. निखिल याने २१ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकताना हरयाणाच्या नितीनकुमार याच्यावर सनसनाटी विजय मिळविला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. नितीनकुमार याने कनिष्ठ गटात आशियाई व जागतिक चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळेच या लढतीत नितीनचे पारडे जड मानले जात होते. तथापि निखिल याने खेळाच्या जोरावरच त्याने ४-१ अशी विजयश्री खेचून आणली. निखिल याने अंतिम फेरीत स्थान मिळविताना अगोदरच्या फेºयांमध्येही आश्चर्यजनक विजय मिळविले होते.
निखिल हा मुंबई येथील खेळाडू असून त्याला आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युटचे प्रशिक्षक व्ही.के.शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निखिल याचे वडील अंगरक्षक म्हणून नोकरी करतात. पाच भावंडांमध्ये फक्त निखिल यालाच खेळाची आवड असून त्याच्या करिअरकरिता घरच्यांचे संपूर्ण सहकार्य मिळते. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धांमुळे त्याला दहावीची परिक्षा देता आली नव्हती. यंदा मात्र तो ही परीक्षा देणार आहे. त्याने आतापर्यंत राज्य व अखिल भारतीय स्तरावर अनेक पदके मिळविली आहेत.