पुणे। खेळातच रमलेल्या कुटुंबात वाढलेल्या महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. सेंटर कोर्टवर झालेल्या उत्कंठापूर्ण लढतीत प्रेरणा हिने गुजरातच्या प्रियांशी भंडारी हिचे आव्हान ६-२, ५-७, ७-५ असे परतविले. प्रेरणा ही मुंबई येथील पॅक टेनिस अकादमीत सराव करते. राष्ट्रीय स्तरावर तिला तिसरे मानांकन आहे. तिने कनिष्ठ गटाच्या अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पहिल्या दोन क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.
खेळासाठी घरातच पोषक वातावरणात वाढलेल्या प्रेरणा हिने वयाच्या सातव्या वर्षीच टेनिसचे करिअर सुरू केले आहे. विजेतेपदाबद्दल ती म्हणाली, माझी आजी बॅडमिंटनपटू तर मामा रणजीपटू असल्यामुळे मला पालकांकडून खेळासाठी सतत प्रोत्साहन मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवित ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पात्रता फेरीत संधी मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी परदेशातही अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
प्रियांशीविरुद्धच्या अंतिम सामन्याविषयी ती म्हणाली, पहिल्या सेटमध्ये अपेक्षेप्रमाणे माझा खेळ समाधानकारक झाला. दुसºया सेटमध्ये मी परतीच्या फटके व सर्व्हिस यावर नियंत्रण ठेवू शकली नाही. हा सेट गमावल्यानंंतर मात्र मी पुन्हा सर्व्हिसव क्रॉसकोर्ट फटक्यांंवर नियंत्रण मिळविले. या सेटमध्ये प्रियांशी हिने चिवट झुंज दिली. तथापि शेवटपर्यंत मी खेळाची सूत्रे माज्याकडे ठेवीत विजयश्री खेचून आणली.
मुलांच्या एकेरीत ध्रुव सुनीश याला तामिळनाडूच्या मनीष सुरेशकुमार याने ६-३, ६-३ असे सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले. ध्रुव याला या सामन्यात अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. मनीष याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने भेदक सर्व्हिसही करीत ध्रुव याला फारशी संधी दिली नाही. सामना संपल्यानंतर ध्रुव म्हणाला, मी खेळावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. अर्थात मनीष याने सुरेख खेळ केला. येथील उपविजेतेपददेखील माज्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आगामी करिअरसाठी या स्पधेर्तील अनुभव मला खूपच उपयुक्त ठरणार आहे.