पुणे | आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंना फारसे यश मिळत नाही हे लक्षात घेऊनच सामान्य नागरिकांना क्रीडा संस्कृतीची ओळख व्हावी व त्यामधून भावी आॅलिंपिक पदक विजेते घडावेत अशी पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी खेलो इंडिया हा महोत्सव राज्यातील उदयोन्मुख खेळांडूंसाठी सुवर्णसंधी आहे, असे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया महोत्सवाला महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील मैदानावर ९ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तावडे यांनी क्रीडानगरीत संबंधित पदाधिका-यांची बैठक घेतली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, पुण्याचे प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये, साईचे उपमहासंचालक संदीप प्रधान, राज्याच्या क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव आणि खेलो इंडिया संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, राज्याच्या क्रीडामंत्र्यांचे स्वीयसचिव श्रीपाद ढेकणे यांसह सर्व खात्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विनोद तावडे यांनी पुढे सांगितले, या महोत्सवात क्रीडाविषयक प्रदर्शने, व्याख्याने, परिसंवाद, ज्येष्ठ खेळाडूंच्या मुलाखती, प्रशिक्षकांकरिता कार्यशाळा, क्रीडा करिअरबाबत खेळाडू व पालकांसाठी उद्बोधक चर्चासत्र आदी विविध उपक्रम होणार असल्यामुळे क्रीडा चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. क्रीडानगरीतील विविध सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून या महोत्सवात सहभागी होणा-या खेळाडूंमध्ये अनेक जागतिक कीर्तिच्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे त्यांचे कौशल्य पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.
गिरीश बापट म्हणाले, हा महोत्सव यशस्वी होण्याची जबाबदारी पुण्याकडे आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधील सर्व संबंधित अधिका-यांचेही सहकार्य मिळत आहे. हा महोत्सव यशस्वी करीत मोदी साहेबांचे स्वप्न साकारण्यास सर्वजण मदत करतील अशी मला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. विनोद तावडे यांसह सर्वांनी तयारीचा आढावा घेत विविध क्रीडागणांची पाहणी देखील केली.