गुवाहटी। खेलो इंडियाच्या तिस-या पर्वातील महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील गटातील आगेकूच अंतिम फेरीत हरियाणाने एकतर्फी रोखली. हरियाणाने त्यांचा ४१-२७ असा पराभव केला.
अंतिम फेरीच्या लढतीत चढाईपटू लयमध्ये असल्यामुळे बचावफळीच्या यशावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून रहाणार होते. मात्र, याच आघाडीवर महाराष्ट्राला अपयश आले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंकज मोहिते, अस्लम इनामदार हे राज्याचे प्रमुख चढाईपटू महाराष्ट्रासाठी एकतर्फी लढले. पण, बचावात त्यांना साथ मिळू शकली नाही.
त्यातच हरियाणाचा कर्णधार कोपरारक्षक सौरभ नांगल महाराष्ट्राच्या यशाच्या आड आला. त्याच्या भक्कम बचावामुळे महाराष्ट्राचे चढाईपटू मोकळेपणाने चढाई करू शकले नाहीत. त्याने पकडीचे सहा गुण मिळविले. त्यावेळी महाराष्ट्राचा कोपरारक्षक शुभम शिंदेची क्षमता ओळखून हरियानाने डावपेच आखले आणि त्याच्यासमोर चढाईच केली नाही. त्यांचे हे नियोजन चांगलेच यशस्वी ठरले. त्यामुळे हरियानाच्या अनुजकुमारने चढाईत मिळविलेले ९ गुण देखील त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. हरियानाने चढाईत १७, पकडीत २० गुण नोंदविताना महाराष्ट्रावर तीन लोण देत आपले वर्चस्व सिद्ध केले.
महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.