चेन्नई : अतिशय आव्हानात्मक असलेल्या दोन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत महाराष्ट्राच्या अंजली मडवी व चैताली बोरेकर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकून खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समधील शेवटचा दिवस गाजविला. त्याआधी, महाराष्ट्राच्या सिया सावंतची अॅथलेटिक्समध्ये दुहेरी मुकुटाची संधी हूकली. बुधवारी १०० मीटर्स धावण्याचे सुवर्णपदक जिंकणार्या सियाला आज २०० मीटर्सच्या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याचबरोबर महिलांच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.
सायंकाळच्या सत्रात झालेल्या २००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत नागपूरच्या अंजली व चैताली या दोन्ही खेळाडूंनी अतिशय नियोजनबद्ध धाव घेतली. शेवटपर्यंत या दोघींनी अन्य खेळाडू आपल्याला मागे टाकणार नाही याची खबरदारी घेतली आणि पदकांवर नाव कोरले. अंजलीने ही शर्यत सात मिनिटे १६.५१ सेकंदात जिंकली. तिच्या पाठोपाठ हे अंतर पार करणार्या चैताली हिने सात मिनिटे १६.९६ सेकंदाची वेळ नोंदवली.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर अंजली म्हणाली, चैताली ही माझ्या बरोबरच धावत असल्यामुळे मलादेखील अतिशय उत्साहानेच ही शर्यत पार करण्यास मदत झाली. आम्ही दोघी पदके मिळू शकलो यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. चैताली म्हणाली,’ माझीच सहकारी असलेल्या अंजली हिला विजेतेपद मिळाल्यामुळे मी खूप खुश झाले आहे. आमच्यासाठी ही शर्यत अतिशय संस्मरणीय झाली आहे. ‘
सियाचे रौप्यपदकावर समाधान
सिया सावंतला २०० मीटर शर्यतीत २५.१६ सेकंद खेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या अभिज्ञा राज हिने ही शर्यत २४.८५ सेकंदात जिंकली. या शर्यतीमध्ये शेवटचे २५ मीटर अंतर बाकी असेपर्यंत सिया हिच्याकडे आघाडी होती. त्यावेळी ती सुवर्णपदक जिंकणार असेच वाटत होते. मात्र, तिच्या पेक्षा जास्त उंची असलेल्या अभिज्ञा हिने अंतिम रेषेजवळ जोरदार मुसंडी मारली आणि सुवर्णपदक खेचून आणले.
सिया ही मुंबई येथे रवी बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून, तिने यापूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने महाराष्ट्राला दिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. काल १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळवणार्या ऋजुला भोसले हिला मात्र आज २०० मीटरच्या पात्रता फेरीतच पराभूत व्हावे लागले.
मुलांच्या २०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टलेनो याला कांस्यपदक मिळवण्यात अपयश आले. त्याने २२.२७ सेकंद वेळ नोंदवित चौथा क्रमांक मिळविला.
महिलांच्या १००० मीटर्स स्प्रिंटमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदक
महिलांच्या १०० मीटर्स स्प्रिंट रिलेमध्ये शर्यतीत मधुरा बिरजे, ऋजुला भोसले अलिझा मुल्ला व श्रावणी सांगळे या खेळाडूंनी महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. या शर्यतीमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक या संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली.
तिहेरी उडीत भूषण शिंदेला कांस्य पदक
महाराष्ट्राच्या भूषण शिंदे याने मुलांच्या तिहेरी उडी मध्ये कांस्य पदक पटकावले. त्याने सहाव्या प्रयत्नात १४.०८ मीटर पर्यंत उडी मारली. या प्रकारात तामिलनाडूने रवी प्रकाशने सुवर्ण तर तामिळनाडूच्या के युवराजने रौप्य पदक जिंकले.
नेमबाजीमध्ये प्राची गायकवाडला कांस्य
महाराष्ट्राच्या प्राची गायकवाड हिने मुलींच्या पन्नास मीटर्स थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला वेध घेतला. तिचे ४३९.६ गुण झाले. पहिल्या पाच क्रमांकामध्ये नसलेल्या प्राची हिने स्टँडिंग पोझिशनमध्ये उत्तम कौशल्य दाखवीत तिसर्या क्रमांकावर झेप घेतली. अनुष्का ठाकूर, कर्नाटक (४६०.८०) व मेलविना एंजिलेना, तामिळनाडू (४५०.३) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. प्राची ही मुंबईत अरुण वारेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तसेच वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तिला गन फॉर ग्लोरी अकादमीतील बिबास्वान गांगुली व शुभम पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. प्राची हिचे वडील शशिकांत हे पोलीस दलात असून त्यांच्या प्रोत्साहनामुळेच लहानपणापासून प्राची हिला नेमबाजीची आवड निर्माण झाली. तिने पाचव्या वर्षीच नेमबाजीच्या सरावास प्रारंभ केला. दहाव्या वर्षी ती एअर रायफलकडे वळली आणि इसवी सन २०२० पासून ती थ्री पोझिशन या प्रकारात भाग घेत आहे. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्निल कुसाळे हे तिच्यासाठी आदर्श खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला यश मिळवायचे आहे. यापूर्वी तिने अखिल भारतीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या वेदांती भट हिचे मात्र कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथे स्थान मिळाले. तिने ४२६.७ गुणांची नोंद केली.
बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींना कांस्यपदक
महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर ९० विरुद्ध ७१ असा शानदार विजय मिळविला आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील मुलींच्या बास्केटबॉल मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राने उत्कृष्ट सांघिक कौशल्याच्या जोरावर या सामन्यात सुरुवातीपासूनच आपली आघाडी राखली होती. पहिल्या डावात २५-२२ अशी आघाडी घेणार्या महाराष्ट्राने मध्यंतराला ५१-३२ अशी आघाडी मिळविली होती. तिसर्या डावा अखेर त्यांनी ही आघाडी ७४-४७ पर्यंत वाढविली होती. महाराष्ट्राकडून सानिका फुले (२० गुण), अनया भावसार (१८ गुण), मानसी निर्मळकर (१६ गुण) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. महाराष्ट्र संघास जयंत देशमुख व ललित नहाटा यांचे मार्गदर्शन लाभले होते. मध्यप्रदेश संघाकडून गुणवी अग्रवाल (२२) व सानिया प्रधान (१३) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्रातील टेनिसपटूंसाठी लक्ष्यवेध कार्यक्रमाची घोषणा, क्रीडा संचलनालय आणि महाटेनिस फाऊंडेशनला मिळणार एमएसएलटीएचे सहकार्य
एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस दुहेरीत भारताच्या अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले उपांत्य फेरीत