भारत दौरा करून नुकतेच मायदेशी परतलेले वेस्ट इंडिजचे खेळाडू सध्या त्रिनिदाद टी१० ब्लास्ट (Trinidad T10 Blast 2022) स्पर्धेत खेळताना दिसत आहे. वेस्ट इंडिजचा मर्यादीत षटकांचा कर्णधार कायरन पोलार्ड देखील या स्पर्धेत सार्लेट आयबस स्कॉचर्स संघाकडून खेळत आहे. या संघाचा तो कर्णधारही आहे. दरम्यान, या स्पर्धेत त्याने फिरकी गोलंदाजी केल्याने तो चर्चेत आला आहे.
खरंतर पोलार्ड जागतिक क्रिकेटमध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो ताबडतोड फलंदाजी करण्याबरोबरच नेहमी मध्यमगतीने गोलंदाजीही करतो. पण त्याने २७ फेब्रुवारीला सार्लेट आयबस स्कॉचर्स संघाकडून खेळताना सोका किंगविरुद्ध (Scoa King vs Scarlet Ibis Scorchers) फिरकी गोलंदाजी केली. विशेष म्हणजे त्याला विकेटही मिळाली.
ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळलेल्या गेलेल्या या सामन्यामध्ये स्कॉचर्स संघाने नाणेफेक जिंकून सोका किंगला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सोका किंगनेही याचा फायदा घेत ४ षटकांच्या आतच ५० धावांचा टप्पा ओलांडला होता. सोका किंगच्या सलामीवीरांना ताबडतोड फलंदाजी करताना पाहून पोलार्ड चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फायदेशीर देखील ठरला (Kieron Pollard turns off-spinner in Trinidad T10 Blast 2022)
Kieron Pollard bowling off-spin in the Trinidad T10 Blast.pic.twitter.com/rN0mq04II8
— Johns. (@CricCrazyJohns) February 28, 2022
त्याने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सोका किंगचा यष्टीरक्षक फलंदाज लिओनार्डो जुलिएनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. जुलिएन २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पोलार्डने पहिली विकेट घेतली असली तरी स्कॉचर्सचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण सोका किंगने १० षटकात तब्बल १५० धावा केल्या. पोलार्डने या सामन्यात एकच षटकात गोलंदाजी केली. त्याने या षटकात १ विकेट काढण्याबरोबरच १० धावा दिल्या.
प्रतिउत्तरादाखल, स्कॉर्चर्स संघाला ८ षटकात ३ बाद ८० धावाच करता आल्या. त्यामुळे स्कॉर्चर्सला डकवर्थ लुईस नियमानुसार ४२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. स्कॉर्चर्सकडून निकोलस सूकदेवसिंगने सर्वाधिक ५३ धावा केल्या, पण बाकी कोणाला फार काही करता आले नाही. पोलार्डही ८ धावांवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने १०० व्या कसोटीत केवळ ९ खेळाडूंना जमलेली ‘ती’ कामगिरी करावी, सुनील गावसकरांची इच्छा
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत राखून भारताचा करून दिला फायदा, पाहा कसं?
पुजारा-राहणेला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही मिळणार नाही स्थान? वाचा सविस्तर