पुणे । उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंदकेसरी हरियाणाचा परवेश मान यांच्यात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत किरण भगत विजयी ठरला. तब्बल अर्धा तास चाललेल्या या कुस्तीत दोघेही मल्ल ताकदीने लढले. परंतु किरण भगतच्या चालीपुढे परवेश मान अखेर अपयशी ठरला. आणि किरणने चांदीची गदा पटकाविली.
समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त शिवशंभो स्टेडीयम कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला १०० वर्षापेक्षा मोठी परंपरा असून पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल स्पर्धेत सहभागी झाले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ४ लाख रुपये तसेच स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण २६ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुज्जर ही लढत एकतर्फीच झाली. यालढतीत गुज्जरने माऊलीला जिंकण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच त्याने माऊलीला चितपट केले. दिल्लीचा हितेश कुमार विरुद्ध कोल्हापूरचा बालारफीक शेख या कुस्तीमध्ये हितेश कुमार विजयी ठरला. विजेत्या पैलवानांना चांदीची गदा बक्षिस म्हणून देण्यात आली.
यानिमित्ताने देशातील तगडया मल्लांचे मल्लयुद्ध अनुभविण्याची संधी कुस्तीप्रेमींनी घेतली. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण ६६ कुस्त्या या महाराष्ट्र चॅम्पियन, आॅल इंडिया युनिर्व्हसिटी चॅम्पियन तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांतील वादळ निर्माण करणा-या मल्लांच्या झाल्या.
अन्य निकाल –कौतुक डाफळे (पुणे) विजयी विरुद्ध प्रविण भोला (दिल्ली), उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर विजयी विरुद्ध विकास जाधव, सागर बिराजदार (पुणे) विजयी विरुद्ध योगेश बोंबाळे (कोल्हापूर), अक्षय शिंदे (पुणे) विजयी विरुद्ध विजय गुटाळ (कोल्हापूर), विलास डोईफोडे (पुणे) विजयी विरुद्ध ज्ञानेश्वर गोचडे