भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनीही आगामी मालिकेविषयी आपली मते मांडली. भारतीय संघाने इंग्लंडला हलक्यात घेऊ नये, असे मोरे यांनी म्हटले.
शुक्रवारी सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
किरण मोरे यांनी दिली प्रतिक्रिया
भारताच्या सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक राहिलेल्या किरण मोरे यांनी आगामी मालिकेविषयी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली मते मांडली. मोरे यांनी म्हटले, “भारतीय संघाने इंग्लंडला हलक्यात घेऊ नये. भारत नक्कीच चांगली कामगिरी करेल मात्र इंग्लंड संघ देखील पूर्ण तयारीनिशी दाखल झाला आहे. त्यांच्याकडे दोन चांगले फिरकीपटू आहेत. कसोटीत कोणताही संघ कमजोर नसतो. एका सत्रात सामन्याचे पारडे फिरू शकते.”
किरण मोरे यांनी इंग्लंडचा कर्णधार जो रूट व अष्टपैलू बेन स्टोक्स यांचे कौतुक केले. मोरे म्हणाले, “रूट व स्टोक्स हे इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजांना चांगले खेळताना दिसत आहेत. ते चांगले तयारीनिशी आलेले दिसतात.”
मोठ्या दौऱ्यासाठी दाखल झाला आहे इंग्लंड संघ
इंग्लंडचा संघ भारतात दीर्घ दौऱ्यासाठी २५ जानेवारी रोजी दाखल झाला आहे. या दौऱ्यावर इंग्लंड संघ चेन्नई येथे दोन व अहमदाबाद येथे दोन कसोटी सामने खेळेल. त्यानंतर अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याची सांगता पुणे येथील तीन वनडे सामन्यांनी होईल.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील रोमहर्षक कसोटी सामने, एक तर सुटला होता बरोबरीत
आरंभ है प्रचंड! भारतीय संघाचे खेळाडू उतरले चेपॉकच्या मैदानात, पाहा फोटो
भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता