इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) चा अंतिम सामना शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकत चौथ्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याचा चेन्नईचा इरादा असेल. तर मागील ७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोलकाता संघ तिसरे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. परंतु कोलकाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याचा फलंदाजी फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशात या महत्त्वपूर्ण सामन्यात तो स्वत:ला बाकावर बसवण्याची शक्यत वर्तवली जात आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने यासंबंधी दावा केला आहे. मॉर्गनची मागील आयपीएल सामन्यातील खराब आकडेवारी पाहता त्याने स्वत:लाच संघाबाहेर ठेवत इतर खेळाडूला संधी दिल्यास आपल्याला नवल वाटणार नसल्याचे त्याने म्हटले आहे.
क्रिकबजशी बोलताना वॉन म्हणाला की, चेन्नई विरुद्धच्या अंतिम सामन्यातून जर कोलकाचा कर्णधार मॉर्गनने स्वत:ला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले, तर त्याला आश्चर्य वाटणार नाही. तो स्वत:च्या जागी आंद्रे रसेलला संघात खेळवू शकतो. रसेल दुखापतीमुळे मागील ५ आयपीएल सामन्यांना मुकला आहे. परंतु आता त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली असून तो फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावही करताना दिसला आहे.
“कोलकाता संघाला खेळपट्टीच्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. कारण कोलकाताचा संघ आतापर्यंत सर्वाधिक शारजाहच्या मैदानावर सामने खेळला आहे आणि या खेळपट्टीवर त्यांचे प्रदर्शनही चांगले राहिले आहे. परंतु दुबईचे मैदान जेथे अंतिम सामना होणार आहे, कोलकातासाठी तेथील स्थिती जराशी वेगळी आहे. जर या सामन्यात रसेलने ४ षटके गोलंदाजी केली तर शाकिब अल हसनला बाहेर करावे लागू शकते. परंतु या डावखुऱ्या फिरकीपटूला संघाबाहेर ठेवणे, खरोखरच बरोबर असेल का? याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे मॉर्गन स्वत:लाच संघाबाहेर ठेवण्याचा विचार करेल. कारण तो नेहमीच संघाच्या हिताचा विचार करत असतो,” असे वॉनने म्हटले आहे.
इयॉन मॉर्गनसाठी अतिशय खराब राहिलाय आयपीएल २०२१ चा हंगाम
यंदाच्या हंगामात दमदार प्रदर्शन करत कोलकाता संघाने अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला आहे. परंतु त्यांच्या या प्रवासात कोलकाताचा कर्णधार मॉर्गनचा खराब फॉर्म सर्वांच्या नजरेपासून लपून राहिलेला नाही. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये फक्त १२९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी केवळ ११.७२ इतकी राहिली आहे.
इतकेच नव्हे तर, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अतिशय महत्वपूर्ण अशा दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातही अपयशी ठरला होता. भोपळाही न फोडता बाद होत त्याने एका हंगामात सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारा पहिला कर्णधार बनण्याचा नकोसा विक्रमही केला होता. तसेच तो तब्बल १० सामन्यांमध्ये दुहेरी धावाही करू शकलेला नाही. त्यामुळे मॉर्गनने अंतिम सामन्या बाकावर बसणे, हा योग्य निर्णय ठरू शकतो. त्याच्याजागी माजी कर्णधार दिनेश कार्तिक संघाचे नेतृत्त्वपद सांभाळू शकतो.






