कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे दुसरे टप्पा लवकरच यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी पहिल्या टप्प्यातील सातही सामन्यात बाकावर बसलेल्या कुलदीप यादवने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघावर खूप आश्चर्यजनक विधान केले आहे.
केकेआरने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. पण सध्याच्या मोसमात संघाची कामगिरी चांगली नव्हती. संघाला २०२१ मध्ये केवळ २ सामने जिंकता आले. गुणतालिकेत संघ ७ व्या क्रमांकावर आहे. संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने याबाबत मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, “केकेआर संघ आयपीएल स्पर्धा गांभीर्याने घेत नाही. गौतम गंभीर कर्णधार असताना नेहमीच संघाला पुढे नेण्याचा विचार करत असे.”
कुलदीप यादव स्पोर्टकीडाशी बोलताना म्हणाला, “जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की विराट कोहली चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न करतो. त्याची संघाला पुढे नेण्याची भूकदेखील दिसते. गौतम गंभीर जेव्हा संघाचा कर्णधार होता तेव्हा त्याचीही अशीच मानसिकता होती. त्याला संघ विजयी करायचा होता. परंतु आताच्या क्षणी आम्ही ते गमावत आहोत आणि त्यांची तशी मानसिकताही नाही.”
केकेआरचा पाठिंबा मिळाला नाही
कुलदीप यादव म्हणाला की, “जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशासाठी खेळता आणि तुम्हाला फ्रँचायझीमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, तेव्हा ते अनुचित वाटते. या गोष्टींबद्दल आपणास वाईट वाटते. परंतु कठोर परिश्रमeव्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. मला केकेआर संघाकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. गौतम भाईने माझ्यावर ज्या प्रकारचा विश्वास दाखविला आहे, तो कदाचित मला या संघात मिळणार नाही.”
कुलदीप यादव म्हणाला की, “कदाचित संघ आयपीएल स्पर्धा गांभीर्याने घेत नाही किंवा पराभवानंतर संघ आपला दृष्टीकोन बदलण्याचा विचार करीत नाही. या गोष्टी बर्याच महत्त्वाच्या आहेत पण ते सर्व आता गायब आहेत.”
कुलदीप यादव याला सध्याच्या मोसमातील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गौतम गंभीरच्या नेतृत्वात त्याने १५ सामन्यांत १८ गडी बाद केले होते. एकूण आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलताना कुलदीप यादवने ४५ सामन्यांत ४० बळी घेतले आहेत.
आयपीएलचा सध्याचा हंगाम २९ सामन्यांनंतर ४ मे रोजी स्थगित करण्यात आला. उर्वरित सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
दुर्लक्ष, फक्त दुर्लक्ष! श्रीलंका दौऱ्यावरही निवड न झाल्याने उनाडकटने उचलले ‘मोठे पाऊल’
SLvIND: संघनायकाची दिव्यदृष्टी! संजूने फारपुर्वीच केली होती त्याच्या सहकाऱ्याच्या निवडीची भविष्यवाणी
‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम